चोरांची हद्द झाली.. शोरूमचे कुलूप तोडून नवीकोरी कार पळवली, तलासरीतील अजब घटना

घरे फोडून दागदागिने आणि रोकडवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांनी आता हद्दच केली आहे. त्यांनी गाड्यांच्या शोरूमला लक्ष्य केले आहे. इभाडपाडा परिसरातील टाटा शोरूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क नवीकोरी कारच चोरून नेली आहे. चोरट्यांचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

इभाडपाडा येथील द्वारका इन्क्लाव्ह इमारतीमध्ये टाटाचे शोरूम आहे. या शोरूमच्या बाजूला बँक ऑफ महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. रात्रीच्या सुमारास दोन चोरटे अल्टो कारने शोरूमच्या ठिकाणी आले. काही वेळ रेकी करून चोरट्यांनी शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. शोरूममधील नवीकोरी टाटा पंच कार चोरट्यांनी पळवून नेली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शटर उचकटून कार चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांची गस्त वाढवा

चोरीसाठी आणलेली अल्टो कारही चोरीची असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही चोरीची कार मनोर परिसरातील आहे. नवीकोरी कार चोरून चोरट्यांनी अल्टो कार ठक्कर बाप्पासमोर रस्त्याच्या कडेला पार्क करून धूम ठोकली. चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केले आहे.