मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलनं थांबवा! राज ठाकरेंचे घुमजाव, जनतेवर टाकली जबाबदारी

शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मराठी भाषा, मराठी बाणा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा पळवून त्याद्वारे राजकारण करण्याचा प्रयत्न करणारे मनसे नेते राज ठाकरे यांनी आठवड्याभरातच मराठीच्या मुद्द्यावरील आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. मराठीचा मुद्द्यावरून त्यांनी घुमजाव करत आंदोलन थांबवण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे.

महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पाहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी आवाज उठवा, असे आवाहन मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केले होते. मात्र, याला बँक कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर आज सकाळी ‘एसंशि’ गटाचे मंत्री राज ठाकरे यांना भेटले. आणि लगेच राज ठाकरे यांनी घुमजाव केले. मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. याबाबत त्यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

त्यांनी लिहिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे… आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. राज ठाकरे यांनी पत्रात नमूद करत मराठी भाषेच्या मुद्द्याची जबाबदारी जनता आणि सरकारवर टाकली आहे.