माजी सैनिकांसाठी आरक्षित सरकारी नोकरीतील घुसखोरी थांबवा, शौर्यपदके काढून माजी सैनिकांची कोल्हापुरात निदर्शने

माजी सैनिकांसाठी असलेल्या सरकारी नोकरीतील घुसखोरी थांबवावी तसेच दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशापर्यंत या पदांवर इतरांना नियुक्ती देऊ नये, या मागणीसाठी माजी सैनिकांकडून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सैन्य दलातील मिळालेली मेडल्स समोर ठेवून माजी सैनिकांनी सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. तसेच, नोकरी द्या अन्यथा यापुढे मेडल्स परत करू, असा इशाराही देण्यात आला.

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या वतीने दोन महिन्यांपासून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने सरकारी नोकरीत माजी सैनिक आरक्षणाच्या जागांवर नियमबाह्य रीतीने सुरू असलेली भरती व संभाव्य आर्थिक व्यवहार यांची माहिती देऊन या पदांवरील घुसखोरी थांबवण्याची मागणी केली आहे. मात्र, सैनिक कल्याण विभागाकडून या भरतीमध्ये चुकीच्या पद्धतीचा अवलंब सुरू असून, तो थांबवावा, असे पत्र देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. माजी सैनिकांच्या रिक्त जागा विक्री करून शेकडो कोटी रुपये कमावण्याचा उद्देश असल्याचे माजी सैनिक सांगत आहेत. या गंभीर प्रकाराचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सैनिकांना आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत, सीमेवर लढताना गाजवलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून मिळालेली मेडल्स जिल्हाधिकाऱ्यांना परत करावी लागत असल्याची खंतही व्यक्त केली. सैनिकांचा सन्मान ठेवण्यासाठी आरक्षणातील घुसखोरी थांबवा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, 11 डिसेंबर 2024 रोजी अवर सचिव ग्रामविकास विभाग यांनी सर्व जिल्हा परिषदांना माजी सैनिकांच्या जागांवर इतरांना नियुक्ती द्यावी, असे पत्र दिले आहे. हे पत्र भरतीप्रक्रियेतील प्रतीक्षाधीन उमेदवारांनी प्रयत्न करून मंत्रालयातून काढून घेतले असल्याने याबाबी गंभीर आहेत. त्यामुळे संभाव्य नियुक्ती आपल्यालाच मिळावी म्हणून बेकायदेशीररीत्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून पत्र काढणे ही पद्धत भरती प्रक्रिया विश्वासार्हता, पारदर्शकता व गोपनीयतेचा भंग करणारी असून, यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हे पत्र देण्यामागील खरे कारण शोधावे. समिती नेमून संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, समीर खानोलकर, अशोक माळी, भगवान पाटील, विजय पाटील, तानाजी खाडे, सचिन पाटील, तानाजी चव्हाण, शशिकांत साळुंखे यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.