पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशात पोलिसांवर दगडफेक

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसोबतच 4 राज्यांतील 15 विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान संपले. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिह्यातील मीरपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांना जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला.

 जमावाला पांगवण्यासाठी ककरौली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजीव शर्मा यांनी महिलांकडे बंदूक रोखून गोळ्या घालण्याची धमकी दिली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पोलीस निरीक्षक बंदूक रोखत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली.

कुठे किती मतदान (टक्क्यांमध्ये)

उत्तर प्रदेश-  9 जागा

करहल (मैनपुरी)- 20.71, सीसामऊ (कानपूर)- 15.91, कटेहरी (आंबेडकर नगर)- 24.28, कुंदरकी (मुरादाबाद)- 28.54, मीरापूर (मुझफ्फरपूर)- 26.18, गाझियाबाद – 12.87, फूलपूर (प्रयागराज)- 17.68, खैर (अलीगढ)- 19.18, मझवां (मिर्झापूर)- 20.41.

महाराष्ट्र – 1 जागा

नांदेड लोकसभा- 12.59

पंजाब – 4 जागा

गिद्दडबाहा (मुक्तसर) – 32.85, डेरा बाबा नानक (गुरुदासपूर)- 25.50, चब्बेवाल (होशियारपूर)- 12.71, बरनाला 16.30

उत्तराखंड – 1 जागा

केदारनाथ – 17.69

केरळ – 1 जागा

पल्लकड- 24.95

मतदानास नकार दिल्याने मुलीची हत्या

मैनपुरीतील करहल येथे एका दलित मुलीची मतदानादरम्यान हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत भरून ठेवण्यात आला होता. गावातील तरुणावर हत्येचा आरोप असून मतदानास नकार दिल्याने त्याने आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला.

प्रशासन भाजपचे एजंट -डिंपल यादव

प्रशासन भाजपचे एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप सपाच्या खासदार डिंपल यादव यांनी केला आहे. डिंपल यादव यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. जिथे निवडणुका होत आहेत तिथे मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात येत आहे. हे अत्यंत गंभीर आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिली.

मतदारांची ओळखपत्रे तपासणारे पोलीस अधिकारी निलंबित

मतदानासाठी जाणाऱया मतदारांची ओळखपत्रे तपासणाऱया एसआय अरुण कुमार सिंग आणि एसआय राकेश कुमार नाडर या दोन पोलीस अधिकाऱयांना निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले. मुरादाबादमधील 2 आणि मुझफ्फरनगरमधील 3 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. समाजवादी पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत काही समुदायांना मतदान करण्यापासून रोखल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती. या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.

अबुधाबीहून मतदानासाठी

मतदान हे आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य जपण्यासाठी खास अबुधाबीहून केवळ मतदान करण्यासाठी नरेन्द्र कुलकर्णी आणि सुरेखा कुलकर्णी आले. त्यांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

फ्रँकफ्रूट जर्मनीहून येऊन मतदान

कुलश्री कॉलनी, कर्वेनगर येथील आयटी इंजिनीअर अनुज देशपांडे आणि सानिका अनुज देशपांडे (गृहिणी) हे कुटुंब फ्रँकप्रूट जर्मनी येथे नोकरीनिमित्त असतात. मतदानासाठी खास ते भारतात आले.

कोल्हापूरकरांची पुन्हा मतदानात बाजी

कोल्हापूर ः जिह्यात विधानसभेच्या 10 मतदारसंघांत किरकोळ वादावादी व हमरी-तुमरीचे प्रकार वगळता, सर्वत्र मोठय़ा ईर्षेने व अत्यंत चुरशीने सायंकाळी पाचपर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान झाले. राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहील, असा दावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला.

सांगलीत मतदान वाढले

सांगली ः जिह्यात सरासरी 63.28 टक्के मतदान झाले. जत आणि तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघांत वादावादीचे प्रकार अधिक प्रमाणात घडले. सांगली जिह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत एकूण 99 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

सातारा जिह्यात 67 टक्के मतदान

सातारा – जिह्यात सरासरी 67 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक, तर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. मतदान पेंद्रावरच हृदयविकाराचा झटका येण्याच्या दोन घटना जिह्यात घडल्या. यामध्ये एका मतदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहिल्यानगरमध्ये 70 टक्के मतदान

अहिल्यानगर – जिह्यामध्ये 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जिह्यात सुमारे 70 टक्के मतदान झाले आहे. किरकोळ बाचाबाची, वाद-विवाद वगळता, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे.