
उत्तर प्रदेशच्या विभरपूर गावातील सरकारी जमिनीवर अवैधरीत्या उभारण्यात आलेले गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवल्यावरून जोरदार राडा झाला. कारवाई करून निघताना पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केला. यावेळी पोलिसांच्या वाहनांची तोडपह्ड आणि तुफान दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात आठ पोलीस जखमी झाले.
शनिवारी पोलीस आणि महसूल विभागाचे पथक गावातील सरकारी जमिनीवर उभारण्यात आलेला गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी पुतळे हटवताच गावकरी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून 100 अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
नेमके काय घडले?
विभरापूर येथे होळीपूर्वी पंचायत भवनसमोर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे 11 मार्च रोजी बसवण्यात आले. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर 12 मार्च रोजी हे पुतळे तीन दिवसांच्या आत काढून टाकण्याबद्दल तहसील प्रशासनाने गावकऱयांना नोटीस बजावली, मात्र, पुतळे हटवण्यात आले नाहीत. त्यामुळे उपजिल्हाधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस यांनी बुलडोझरसह पोहोचून दोन्ही पुतळे हटवले. कारवाई करून परतत असताना पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकावर गावकऱयांनी तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात काही गावकरीही जखमी झाले.