कोपरगावात चोरलेल्या दुचाकींची नाशिकमध्ये विक्री, चोरट्यांकडून 13 लाखांच्या 24 दुचाकी जप्त

कमी किमतीत दुचाकी मिळते म्हणून विकत घेताना ती चोरीची नाही ना, याची खात्री करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून 23 लाख रुपयांच्या तब्बल 24 दुचाकी जप्त केल्या आहेत. हा चोरटा कोपरगावातून दुचाकी चोरून त्या नाशिक जिह्यात विक्री करत असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कृष्णा प्रकाश शिंदे (वय 55, रा. इंदिरानगर, कोपरगाव) असे अटक केलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. तर, दुचाकी विकणारा श्रावण सखाराम वाघ (रा. सोमठाण जोश, ता. येवला, जि. नाशिक) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

श्रावण वाघ याच्याकडेच चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा रचून पोलिसांनी श्रावण वाघ याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने दुचाकीचोरीचा मुख्य सूत्रधार कृष्णा प्रकाश शिंदे असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कृष्णा शिंदे याला अटक केली.

कृष्णा शिंदे हा कोपरगावमध्ये चोरलेल्या दुचाकी सोमठाण जोश (ता. येवला) येथे घेऊन जात होता. तेथून तो पुढे आरोपी श्रावण वाघच्या मदतीने चोरीच्या दुचाकी नाशिक जिह्यात येवला, नांदगाव परिसरात विक्री करत होता. नाशिक व येवल्याच्या ग्रामीण भागात आरोपी कमी किमतीत दुचाकीची विक्री करत होते. दुचाकी घेणाऱयाने कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, लवकरच देऊ, असे आश्वासन देत होते.

दुचाकी चोर कृष्णा शिंदे याच्यावर कोपरगाव शहर पोलिसांत वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरल्याचे 27 गुन्हे दाखल आहेत. पैकी 13 लाखांच्या 24 दुचाकी जप्त करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, मयूर भामरे, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, बी. एस. कोरेकर, तिकाणे, जलिंदर तमनर, अर्जुन दारकुंडे, अशोक शिंदे, दीपक रोकडे, गणेश काकडे, श्रीकांत कुऱ्हाडे, महेश फड, बाळू धोंगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.