शेअर बाजारात गेल्या मंगळवारी जबरदस्त तेजी आली होती. तो मंगळवार गुंतवणूकदारांसाठी शुभ ठरला होता. मात्र, आजचा मंगळवार गुंतवणूकदारांसाठी अमंगळ ठरला आहे. अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या निकालापूर्वी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने गुंतवणूकदारांनी जबरदस्त विक्री केली. त्यामुळे सुरुवातीपासून बाजारात मोठी घसरण दिसून आली. अनेक बड्या कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत.
अमेरिकेत फेडची बैठक मंगळवारी रात्री होणार आहे. व्याजदरांबाबत अमेरिका मोठा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता आहे. फेडच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार विक्री केली आहे. मंगळवारी सेन्सेक्समध्ये 1000 हून अधिक अंकांची मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तर निफ्टी 340 अंकांनी घसरला आहे. या घसरणीमुळे 3 तासांत गुंतवणूकदारांचे 3.17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेअर बाजारात अमेरिकेची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. यालाही कारण आहे. प्रथम, अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे, रुपयामध्ये सतत घसरण होत आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारात स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरे मुख्य कारण म्हणजे फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निर्णयापूर्वीची भीती, जी शेअर बाजारात स्पष्टपणे दिसून येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दुपारी 12:17 वाजता 952.84 अंकांच्या घसरणीसह 80,801.30 अंकांवर व्यवहार करत होता. तर व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 80,732.93 अंकांसह खालची पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक 341.70 (-1.39%) अंकांच्या घसरणीसह 24,326.55 अंकांवर व्यवहार करत आहे. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान निफ्टी सुमारे 350 अंकांनी घसरला होता.
शेअर बाजारातील मोठ्या समभागांमध्ये घसरण दिसून येत आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.61 टक्क्यांनी घसरले आहेत. तर भारती एअरटेलच्या शेअरमध्ये जवळपास 3 टक्क्यांनी घसरण होत आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS 1.64 टक्क्यांनी घसरत आहे. तर HDFC बँकेचे शेअर्स 1.41 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. अदानी पोर्ट, आयटीसी, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या समभागात किंचित वाढ झाली आहे.
शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एका दिवसापूर्वी सेन्सेक्सचे मार्केट कॅप 4,60,06,557.30 कोटी रुपये होते. मंगळवारी सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरल्यानंतर तो 4,56,89,322.41 कोटी रुपयांवर आला. त्यामुळे बीएसईच्या मार्केट कॅपला 3,17,234.89 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या तोट्यात आणखी वाढ होऊ शकते.