मोदींसमोरच ट्रम्प बोलले, शेअर बाजाराला संकेत समजले; घसरणीचा सिलसिला सुरूच

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ आणि पराराष्ट्र संबंधांच्या घोषणेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. जगातील अनेक शेअर बाजार ट्रम्प यांच्या धास्तीमुळे कोसळत आहेत. तर डॉलर मजबूत होत असून अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी दिसत आहे. या बाजार घसरणीचा मोठा फटका आशियाई देश आणि हिंदुस्थानला बसत आहे. ट्रम्प यांच्या घोषणेमुळे जगभरात महागाई वाढण्याचा धोकाही व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.तेथे मोदी यांच्यासमोरच ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेत ‘टिट फॉर टॅट’ धोरणांतर्गत शुल्क लादण्याची घोषणा केली. याशिवाय, त्यांनी हिंदुस्थानबाबतही भूमिका स्पष्ट केली. त्याचे संकेत शेअर बाजाराला समजले आणि शुक्रवारीही बाजारात घसरणीचा सिलसिला सुरुच होता.

शुक्रवारी सकाळी बाजार सुरू होताच काही प्रमाणात तेजी होती. मात्र, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम दिसायला लागताच बाजारत मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 575 अंकांनी घसरून 75,557.03 वर आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 50 मध्ये 200 अंकांची घसरण झाली असून तो 22,833 वर व्यवहार करत आहे. या घसरणीचा सर्वाधिक फटका अदानी पोर्टला बसला असून त्यांचे शेअर 3 टक्क्यांनी घसरले आहेत.

या घसरणीचे प्रमुख कारण ठरले ते म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या टॅरिफची घोषणा. त्यांनी हिंदुस्थानबाबतही भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही देशाने आकारलेल्या करांच्या आधारावर आम्ही परस्पर शुल्क लादू असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे म्हणणे असे आहे की जर कोणताही देश अमेरिकेवर 100 टक्के कर लादतो, तर अमेरिका देखील त्या देशावर 100 टक्के कर लादेल. याशिवाय, ते म्हणाले की हिंदुस्थान जास्त कर लादतो. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर 100 कर लादण्याचा इशाराही दिला. त्यात हिंदुस्थानचाही समावेश आहे. या सर्व कारणांमुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. तसेच, कराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हिंदुस्थानी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा हिंदुस्थान आणि थायलंडसारख्या देशांवर सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो, असे जागतिक अर्थतज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले की ते परस्पर करांवर हिंदुस्थानला काही सवलत देणार आहेत का? यावर, मोदींच्या शेजारी उभे राहून ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की हे सर्व देशांसाठी समान आहे. हिंदुस्थान इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त कर आकारतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा व्यवसाय करण्याचा पूर्णपणे वेगळा मार्ग आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर आता असे मानले जात आहे की देशभरात करांबाबत तणाव वाढू शकतो. त्यामुळे बाजारात आणखी घसरण होणार आहे. ट्रम्प यांच्या घोषणेचा हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.