आज शुक्रवारी आठवडय़ाच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी बाजारात लक्षणीय वाढ झाली होती. मात्र त्याच्या दुसऱयाच दिवशी गुंतवणूकदारांच्या पदरी मोठी निराशा आली. आज सेन्सेक्स 800 अंकांनी घसरला होता. पण, व्यवहाराच्या अखेरीस 720 अंकांनी घसरला आणि तो 79,223.11 वर बंद झाला.
बीएसईतील टॉप-30 शेअर्सपैकी 20 शेअर्स घसरत होते, तर 10 शेअर्समध्ये वाढ झाली. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. हा शेअर 3.14 टक्क्यांनी वाढून 788 रुपयांवर पोहोचला. झोमॅटोच्या शेअर्समध्ये 4.27 टक्क्यांनी घसरण झाल्याने तो 272 रुपयांवर आला. तसेच एचडीएफसी बँकेचे शेअर्सही 2.50 टक्क्यांनी घसरले.
दरम्यान, जय कॉर्प लिमिटेडचे शेअर्स जवळपास 10 टक्क्यांनी घसरून 224 रुपयांपर्यंत पोहोचले. डायनॅमिक टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये 5.46 टक्के, काइटेक्स 5 टक्के, झोमॅटो 4.13, अपोलो टायर्स 3 टक्के, गोदरेज 3 टक्के, नॅक्लो 4 टक्के आणि एंजल वनच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांनी घसरण झाली.
गुंतवणूकदारांचे नुकसान
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या मूल्यांकनात घसरण दिसून आली. बीएसईचे मार्केट कॅप 80 हजार कोटी रुपयांनी घसरून 449.67 लाख कोटी रुपये झाले. आधी हा आकडा 450.47 लाख कोटी एवढा होता.