
शेअर बाजार मंगळवारी जोरदार आपटला. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे 3.50 लाख कोटी बुडाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. शेअर बाजार 1391 अंकांनी घसरून 76 हजार अंकांच्या खाली आला तर, निफ्टी 23,150 अंकांच्या खाली आला. सर्वाधिक फटका हा बँकींग आणि आयटी क्षेत्राला बसला. वाहन क्षेत्र सोडले तर सर्व प्रमुख क्षेत्र लाल निशाणावर व्यवहार करताना दिसले. आयटी, रियल्टी, अर्थ आणि कंझ्युमर ड्युरेबल गुड्समध्ये 1-3 टक्के घसरण दिसून आली. बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 3.50 लाख कोटीहून अधिकची घसरण झाली.
शेअर बाजार कोसळण्याचे प्रमुख कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणासह आणखी तीन कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. कच्च्या तेलाचे दर गेल्या पाच आठवड्यांत सर्वाधिक वाढले आहेत. ब्रेंट क्रूड 74.67 डॉलर प्रति बॅरल पर्यंत गेले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या दराचा फटका हिंदुस्थानला बसण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रही दबावात आहे.
2 एप्रिलपासून डोनाल्ड ट्रम्प यांचा रेसिप्रोकल टॅरिफ लागू होणार आहे. सर्व टेरिफ सर्व देशांना लागू असतील. यामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक विकासाची गती मंदावण्याची भीती आहे.