शेअर बाजारात भूकंप; निर्देशांक 6 हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान

लोकसभा निवडणुकीचे कल हळूहळू समोर येत आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीएला 350 हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मतमोजणी सुरू झाल्यानंतर एक्झिट पोलची पोलखोल झाली आणि एनडीएची गाडी 300 पर्यंतही पोहोचू शकली नाही. याचे पडसाद शेअर बाजारावरही उमटवले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकासह बँक निफ्टीही धडाम झाला.

दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 6 हजार अंकांनी कोसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 1800 अंकांनी घसरला. यासह बँक निफ्टीही 4500 अंकांनी खाली आला. यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा गाठताना दिसत नाहीय. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला. सुरुवातीच्या काही क्षणांमध्येच बाजाराने लाल सलाम ठोकला. त्यानंतर सातत्याने बाजारात घसरण नोंदवण्यात आली. 2022 नंतर पहिल्यांदाच बाजारात एवढी घसरण झाली आहे.