शेअर बाजाराला ब्रेक; सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट स्तरांवर बंद

गेल्या पाच दिवसांपासून उसळणाऱ्या शेअर बाजाराला शुक्रवारी अखेर ब्रेक लागला. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 56 अंकांच्या घसरणीसह 81,709 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30.60 अंकाच्या घसरणीसोबत 24,677 अंकांवर बंद झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढत्या महागाईचा दाखला देत रेपो रेट जैसे थे ठेवला आहे. याशिवाय जीडीपीमध्ये जुलै ते सप्टेंबरमध्ये अधिक घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इंडस्इंड बँक, बजाज फिनसर्व, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्पह्सीस, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक्नोलॉजी आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली. तर टाटा मोटर्स, ऑक्सिस बँक, मारुती, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी आणि टाटा स्टीलचे शेअर्स वाढीसोबत बंद झाले. आशियाई बाजारात सियोल आणि टोकियो घसरणीसोबत बंद झाले. तर शांघाय आणि हाँगकाँग फायद्यात राहिले.