शेअर बाजार नव्या उच्चांकावर; सेन्सेक्स 80 हजारपार

शेअर बाजाराने बुधवारी सर्वकालीन उच्चांक गाठला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 80,039 च्या पातळीला तर निफ्टीने 24,292 च्या पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्स 545.35 अंक उसळून आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच 79,986.80 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 162.65 अंक उसळून 24,286.50 अंकांवर बंद झाला. याआधी सेन्सेक्स पहिल्यांदा 80,074 अंकांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. निफ्टीनेही इतिहास रचत 24 हजार 307 अंकांला टच केले. आयसीआयसीआय बँक, कोटक बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. काल म्हणजेच दोन जुलै रोजी शेअर बाजाराने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 79,855 च्या स्तरावर, तर निफ्टीने 24,236 च्या स्तराला स्पर्श केला होता. मात्र त्यानंतर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 34 अंकांच्या घसरणीसह 79,441 वर बंद झाला. निफ्टीही 18 अंकांनी घसरला. तो 24,123 च्या पातळीवर बंद झाला.

– एचडीएफसी बँकेचे शेअर्स बुधवारी 3.8 टक्के वधारले. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास 54 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ शकते, असा अंदाज आहे. एचडीएफसी शिवाय ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँकेच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली.