Stock Market After Budget: निर्देशांकाची घसरण सुरूच; दिवसाची सुरुवात लालेलाल रंगात

Union budget 2024 नंतर बुधवारी शेअर बाजाराने संथ गतीनं सुरुवात केली. निर्देशांक 100 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीने 30 हून अधिक अंकांनी घसरण सुरू केली. याआधी मंगळवारी संसदेत NDA सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या कार्यकाळातील सलग सातवा अर्थसंकल्प सादर करताना अनेक घोषणा केल्या आणि त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. भांडवली नफा कर वाढवण्याच्या निर्णयामुळे बाजाराचा मूड बिघडला आणि गुंतवणूकदार खूप घाबरले. BSE चा निर्देशांक 1200 अंकांनी घसरला होता, तर NSE चा निफ्टी 500 अंकांनी घसरला होता.

निर्देशांक कधी लाल तर कधी हिरव्या रंगात

मंगळवारी शेअर बाजारात प्रचंड गोंधळ झाला आणि आजही बाजार गुंतवणूकदारांना चक्रावताना दिसत आहे. बुधवारी शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक लाल रंगातच उघडले. मुंबई शेअर बाजार 80,343.28 च्या स्तरावर उघडला. मंगळवारी 80429.04 वर कारभार थांबला होता. त्यातुलनेत ही किंचित घट झाली आहे. तर NSE निफ्टी मंगळवारी 24,479 वर बंद झाला होता. आज त्या तुलनेत 24,444 च्या पातळीवर किरकोळ घसरणीसह उघडला. मात्र, सुरुवातीचे चित्र पाहात बुधवारीही शेअर बाजार-निफ्टीचा फलक कधी लाल- कधी हिरवा असा बदलताना दिसत आहेत.

काल निर्देशांक 1200 अंकांनी घसरला

मंगळवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मंगळवारी मुंबई शेअर बाजार निर्देशांक घसरणीसह उघडला. सुमारे 200 अंकांनी घसरून निर्देशांकाने 80,408.90 च्या स्तरावर व्यवहार सुरू केला आणि जेव्हा अर्थमंत्र्यांनी संसदेत त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले तेव्हा सुरुवातीच्या घसरणीचे रुपांतर वाढीमध्ये झाल्याचे दिसत होते, परंतु ते फार काळ टिकले नाही. एक वेळ अशी आली जेव्हा अर्थमंत्र्यांनी करांबद्दल बोलायला सुरुवात केली आणि भांडवली नफा कर वाढवण्याची घोषणा केली, तेव्हा बाजार कोसळला.

केंद्र सरकारने दीर्घकालीन भांडवली नफा कर (LTCG) 12.5 टक्के केला आहे, तर अल्पावधीत काही मालमत्तांवर हा कर (STCG) 20 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. या घोषणेनंतर लगेचच शेअर बाजाराने आपला कल बदलला आणि निर्देशांक 1200 अंकांनी घसरला आणि 79,224.32 च्या स्तरावर पोहोचला. निफ्टी निर्देशांकही (निफ्टी-50) 500 अंकांनी घसरला.