प्रयोगानुभव – प्रौढ विचारांचे खेळकर नाटक

>> पराग खोत

‘प्रेमाला वयाचे बंधन नसते‘ या टॅगलाईन भोवती फिरणारी ही नाट्यसंहिता. खरंतर प्रेमाला कसलेही बंधन नाही, पण त्याला सामाजिक चौकटीत बसविण्याचा आटापिटा करताना होणारा गडबडगुंता आणि धावपळीचा मनोरंजक सफरनामा म्हणजे “स्थळ आले धावून!“

शरद चंद्रात्रे ही एक अफलातून वल्ली. वरिष्ठांसाठी मॅरेज ब्युरो चालवून अडलेल्या वधूवरांना नव्या नात्यांचा गोफ विणून देणारी. प्रसन्न, हसतमुख आणि फिट अॅन्ड फाईन असे हे शरदबाबू आपले हे काम अगदी चोख करत असतात. त्या कामाच्या निमित्ताने एखाद्याची माहिती काढणे आणि त्याला सुयोग्य जोडा सुचवणे ह्यात त्यांचा हातखंडा आहे. अशातच त्यांची जाहिरात बघून सुभाष फडतरे हे पेशाने शिक्षक पण स्वभावाने गरीब आणि घाबरट असलेले गृहस्थ त्यांना भेटायला येतात. त्यांना श्रावणी मेंहेदळे ह्या कीर्तनकार बाई आवडल्या आहेत. त्यांना लग्नाकरिता विचारण्याचे धारिष्ट्य सुभाषकडे नाही आणि म्हणूनच अगतिक होऊन ते शरदकडे आले आहेत. शरद त्याच्या नेहमीच्या स्टाईलने ही केस हातात घेतात आणि शेवटी शुभमंगल होते खरे पण … अनेक अनपेक्षित वळणे घेत आणि छोटे छोटे धक्के देत, खुसखुशीत विनोदाची फोडणी दिलेला हा पदार्थ चाखून बघावा असा आहे.

वाढलेल्या वयातल्या आशा-आकांक्षा आणि त्याच्यावर येणारी सामाजिक बंधने झुगारुन देण्याची बेफिकिरी, अंगी नसलेल्या एका सर्वसामान्य विधुराची ही गोष्ट. सोबतच प्रौढ कुमारिका असलेल्या नायिकेच्या मनाची नाजूक अवस्था आणि त्या विजोड परिस्थितीतूनही सुयोग्य मार्ग काढता येऊ शकतो हे दाखविणारे हे नाटक. ही सगळी मंडळी प्रातिनिधिक आहेत. आपल्या आजूबाजूला दिसणारी आहेत. पण त्यांच्या मनाची घालमेल आणि त्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या प्रश्नांची, शरदच्या माध्यमातून मांडलेली आणि आपल्याला पटणारी समर्पक उत्तरे असे ह्या नाटकाचे स्वरुप आहे. या सगळ्या संवेदनशीलतेला विनोदाची जोड दिल्याने प्रश्नांची दाहकता थोडी कमी होते. आयुष्याच्या संध्याकाळी जोडीदाराची आवश्यकता असते. पण आपला समाज वरिष्ठांच्या साहचर्याकडे पाहून नाकं मुरडतो. त्याच्या हा दुटप्पी वागण्याला हसता-हसवता लगावलेला हा सणसणीत टोला आहे.

डॉ. गिरीश ओक यांनी शरद चंद्रात्रे भन्नाट साकारला आहे. त्यांचे व्यक्तिमत्व, देहबोली आणि दिलखुलासपणा ह्या भूमिकेला आवश्यक होता, तो त्यांनी सहजपणे दाखवलाय. डॉक्टरांचा ट्रेडमार्क असलेली ही भूमिका आहे. संजय मोने यांनी प्रेमात पडलेल्या विधुराची अगतिकता छान दाखवलीय. मात्र कधीकधी ते पात्र नेभळट वाटावे ह्या पातळीपर्यंत त्याचा आलेख खाली जातो आणि ते खटकते. पूर्णिमा तळवलकर या श्रावणी मेंहेदळे छानच उभी करतात. सुभाषसोबतचा त्यांचा शालीन, अव्यक्त रोमान्स आणि शरदसोबतचा ठसका जोरदार. त्यामुळेच हे पात्र अधिक आपल्यातले वाटते, आवडते. लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी सर्व शक्यता पडताळून नाटक नीट बांधले आहे. जागोजागी विनोदाची पेरणी करत ह्या विषयाला पुढे घेऊन जाण्याची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या तीनही कलाकारांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांना चांगली साथ दिली आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आणि शितल तळपदे यांची प्रकाशयोजना विषयाला तसेच मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि विजय गवंडे यांचे संगीत आशयाला पूरक आहे. मंगल विजय केंकरे यांच्या प्रवेश क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या ह्या नाटकाचे सूत्रधार आहेत नितीन नाईक आणि दिपक जोशी.

प्रौढांच्या मनाचा विचार करुन, त्यांच्यासाठी शक्यतांचे एक नवे दालन उघडून दाखविणारे, प्रसन्न विनोदाचा शिडकावा असलेले हे समजूतदार नाटक एकदा पहायलाच हवे असे आहे.

[email protected]