
चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानकडून झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ याने वन डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. मंगळवारी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सेमीफायनल लढतीत हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर बुधवारी सकाळीत स्मिथने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. स्मिथ वन डे क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी कसोटी आणि 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणार आहे.
सेमीफायनल लढतीमध्ये स्टीव्ह स्मिथ याने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 96 चेंडूंचा सामना करत 73 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानपुढे विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान हिंदुस्थानने 6 गड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडू बाकी असताना पूर्ण केले होते.
निवृत्तीची हीच योग्य वेळ असल्याचे वाटते. हा शानदार प्रवास होता आणि मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. अनेक अद्भूत क्षण आणि आठवणी आहेत. दोन वर्ल्डकप जिंकणे माझ्या कारकिर्दीतील मोठी कामगिरी होती, असे स्टीव्ह स्मिथ निवृत्तीची घोषणा करताना म्हणाला.
The two-time @cricketworldcup winner has announced his immediate retirement from ODI cricket 😲https://t.co/2E0MNR57tm
— ICC (@ICC) March 5, 2025
तो पुढे म्हणाला की, आता माझे प्राधान्य कसोटी क्रिकेटला आहे. मी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, त्यानंतर वेस्ट इंडिजचा दौरा आणि घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध होणारी मालिका खेळण्यास उत्सुक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये योगदान देण्यासाठी मला खूप काही करायचे असून माझ्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे.
दरम्यान, पॅट कमिन्स दुखापतग्रस्त झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाची धुरा स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर आली होती. कमिन्स, स्टार्क, हेझलवूड ही गोलंदाजांची तिकडी नसतानाही स्मिथने संघाला सेमीफायनलपर्यंत पोहोचवले. मात्र तिथे ऑस्ट्रेलियन संघाचा हिंदुस्थानने पराभव केला.
स्मिथची वन डे क्रिकेटमधील कामगिरी
स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून 170 वन डे सामने खेळले. यात त्याने 43.28 च्या सरासरीने आणि 86.96 च्या स्ट्राईक रेटने 5800 धावा केल्या. यात त्याच्या 12 शतकांचा आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. वन डे क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 164 असून 2016 मध्ये सिडनी क्रिकेट मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध त्याने ही खेळी केली होती. यासह त्याने गोलंदाजीत 28 विकेट्सही घेतल्या आहेत.