लॉरेन रुद्राक्ष माळा घालणार

स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल ऊर्फ कमला या सध्या महाकुंभमध्ये सहभागी झाल्या आहेत. महाकुंभमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना कमला हे नाव मिळाले असून अच्युत गोत्रसुद्धा प्राप्त झाले आहे. मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वावर श्रीनिरंजनी आखाडाचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलासनंद गिरी यांच्या सेक्टर 9 येथील आचार्य शिबिरात त्यांनी विधिवत पूजा केली.

प्रकृती ठीक नसल्याने पॉवेल या संगम नदीत अमृत स्नान करायला गेल्या नाहीत. स्वामी कैलासनंद यांनी संगमचे जल अंगावर टाकून त्यांना अमृत स्नानची अनुभूती दिली. यानंतर त्यांना विधिवत दीक्षा देण्यात आली. यावेळी त्यांना आजीवन गळय़ात रुद्राक्ष माळा घालण्याचा संकल्प देण्यात आला. लॉरेन पॉवेल या महाकुंभात सहभागी होण्यासाठी 10 जानेवारीपासून आल्या आहेत. पॉवेल या 16 जानेवारीला अमेरिकेसाठी रवाना होतील. कारण, त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहायचे आहे.

कमला भक्तीत लीन

लॉरेन पॉवेल या गेल्या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये स्वामी  कैलाशानंद यांच्या संपर्कात आल्या होत्या. हरिद्वार येथील त्यांच्या आश्रमात जाऊन पूजन अभिषेक केले होते. सध्या लॉरेन या भजन आणि कीर्तनात लीन आहेत. माथ्यावर चंदनाचा टीका, गळय़ात आणि हातात रुद्राक्षाची माळा आहे. दिवसाची सुरुवात योग आणि ध्यानाने होते. कैलाशानंद यांनी त्यांना मुलगी मानून कमला हे नाव दिले आहे.