धोनी भविष्य पाहणारा माणूस नव्हे! फ्लेमिंगकडून धोनीची पाठराखण

महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपद मिळाले असले म्हणून अचानक संघाच्या कामगिरीत मोठा बदल होईल असे कोणीही समजू नये. धोनी उत्तम खेळाडू आहे यात वाद नाही; पण तो भविष्य पाहू शकणारा माणूस नाही, असे चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने स्पष्ट केले असून, धोनीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

यंदाचा आयपीएलचा हंगाम चेन्नईसाठी निराशाजनक ठरला आहे. चेन्नईची सुमार गोलंदाजी, फलंदाजी चिंतेचा विषय ठरत आहे. प्रमुख खेळाडूंना अद्याप लय सापडली नसल्याने चेन्नईचा सलग 5 सामन्यांत पराभव झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्यानंतरही संघाच्या पदरी निराशाच पडली. धोनीच्या नेतृत्वातही पराभव पत्करावा लागल्याने चाहत्यांनी धोनीवर टीकास्त्र सोडले. मात्र, फ्लेमिंगने धोनीचा बचाव करत त्याची पाठराखणही केली आहे.

फ्लेमिंग म्हणाला, कुठलाही संघ असो, धोनीचा प्रभाव नक्कीच परिणामकारक असतो. असे असले तरीही धोनी हा ज्योतिषी नाही. त्याच्याकडे भविष्य पाहण्याचे सामर्थ्य नाही. त्याच्याकडे जादूची कांडी नाही. त्यामुळे धोनी कर्णधार झाल्याने संघाच्या कामगिरीत अचानक मोठा बदल होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

प्रतिस्पर्धी संघाला तगडी टक्कर देण्यात आम्ही अयशस्वी ठरत आहोत. त्या गोष्टीचे आम्हाला खूप दुःख झाले. गेल्या सामन्यानंतर अंतर्गत आत्मपरीक्षण झाले. बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली, असे फ्लेमिंग म्हणाला.