महायुती सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात एकही उद्योग आणला नाही, उलट येथे सुरु असलेले उद्योग बंद पाडले. येथील नागरिक रोजगारासाठी वणवण भटकत आहे. काहींना तर नोकरीसाठी तेलंगणा राज्यात जावे लागते. विकासाच्या खोट्या थापा मारून बल्लारपूर – मुल विधानसभा मतदारसंघातील सुधीर मुनगंटीवार हे खोटारड्या महायुतीचा भाग असून त्यांनी येथील जनतेला फसवले आहे. आता सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी आणि विकासाच्या खोट्या थापा मारणाऱ्या महायुतीला महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार करा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते बल्लारपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुल बल्लारपूर मतदारसंघात शहरातील जयभीम चौक (टेकडी) आणि दुर्गापूर इथे महा विकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्यासाठी सभा घेतल्या.यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप खोटारड्यांचा पक्ष आहे, तेलंगणात बहिणीसाठी प्रतिमाह 2500 रूपये योजना बंद केल्याचे धादांत खोटं भाजप पसरवत आहे. तेलंगणा असो की कर्नाटक या राज्यात योजना अजूनही सुरु आहे. तुम्ही विकास म्हणता मग रोजगारासाठी येथील कामगार परराज्यात का जातात, महीला अत्याचार रोखण्यात शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची महाभ्रष्ट युती सपेशल अपयशी ठरली आहे.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव के. राजू म्हणाले की, काँग्रेसने पाच गॅरंटी घोषणा केली. या गॅरंटी फक्त निवडणूकीपुरते आश्वासन नाही. राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल मध्ये लोकांना या योजनांचा लाभ मिळाला. महाराष्ट्रात पण महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आमचे सरकार महिलांना 3000 रुपये दर महिना देणार असे त्यांनी सांगितले. आज तेलंगणा मध्ये जातीय जनगणना सुरुवात झाली.लोकांच्या घरोघरी जाऊन जातीय जनगणना होणार हे ओबीसीसाठी महत्वाचे आहे. तसेच राहुल गांधी यांनी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्याची भूमिका मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष किशोर कन्हेरे यांनी भाजप उमेदवार मुनगंटीवार यांच्या विकास कामांचा समाचार घेत बल्लारशाह भागात जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा झाली नाही. वृक्ष मोहीमेत किती झाडे लावली व किती जगली यावर प्रश्न उपस्थित केले. यानंतर बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांनी सांगीतले की, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. मी आपल्याला विश्वास देतो की आपण मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास जनतेचे प्रत्येक काम करीन. कार्यक्रमाचे संचालन मेघा भाले, प्रास्तविक घनश्याम मुल चंदानी यांनी केले.
या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव के राजू, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, जिल्हा बँक अध्यक्ष तथा बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत, माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) संदीप गीऱ्हे, डॉ. संजय घाटे, घनश्याम मुल चंदानी, डॉ. वाढई, दिलीप माकोडे, सिक्की यादव, रोशणलाल बिट्टू, गोविंद उपरे, करीमभाई शेख,राजू काबरा,बादल उराडे, मल्लेश्र्वरी महेशकर, याकूब पठाण डॉ. बावणे, डॉ.कुलदीवार, तथा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व प्रमुख उपस्थीत होते.