
नागपूरच्या दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या स्तुपाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, दीक्षाभूमी स्मारक समिती लोकांना विश्वासात न घेता विकासकामे रेटत असल्याचा आरोप करत आंबेडकरी अनुयायांनी पार्किंगच्या कामाला विरोध करत जोरदार आंदोलन केले. संतप्त जमावाने विकासकामाच्या साहित्याची तोडफोड करत जाळपोळ केली. आंदोलनकर्त्यांचा रोष लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकामाला स्थगिती देत असल्याची घोषणा विधानसभेत केली.
नागपूरच्या दीक्षाभूमीवरील सौंदर्यीकरण आणि नवीनीकरणाच्या प्रकल्पातील अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी अनुयायांनी आज कडाडून विरोध दर्शवत परिसरात आक्रमक आंदोलन सुरू केले. शेकडो संतप्त आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तुफान तोडफोड व जाळपोळ केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागपूरचे पोलीस आयुक्त सिंघल यांनी घटनास्थळी धाव घेत स्मारक समिती व राज्य शासनाशी चर्चा करून दीक्षाभूमीवरील बांधकाम त्वरित थांबविण्यात येत आहे असे घोषित करताच जमाव शांत झाला. स्मारक समितीने काम थांबवत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
दीक्षाभूमी परिसरात मोठय़ा संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली. विकासकामाला आमचा विरोध नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्ंकगला आमचा विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी बोलताना व्यक्त केले आहे. आंदोलकांनी स्मारक समिती व राज्य शासनाविरुद्ध घोषणा देत परिसरातील अंडरग्राउंड पार्किंगच्या कामाला विरोध केला. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जोपर्यंत आम्हाला काम थांबविण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यानी घेतल्याने पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. फडणवीस यांनी दीक्षाभूमी परिसरातील आंदोलनाची गंभीर दखल घेत येथील विकासकाम त्वरित बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले. पोलीस आयुक्त सिंघल यांनी डॉ. आंबेडकर स्मारक समितीने आंदोलकांना हे काम त्वरित बंद करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.
संमतीने निर्णय घेण्यात येईल – देवेंद्र फडणवीस
दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा स्मारक समितीने तयार केला आहे. या कामासाठी राज्य सरकारने केवळ 200 कोटी रुपये निधी पुरवला आहे. स्मारक समितीच्या आराखडय़ाप्रमाणे भूमिगत पार्ंकगचे काम हाती घेण्यात आले. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दीक्षाभूमी विकास; नेमका वाद काय?
दीक्षाभूमीवरील सौंदर्यीकरण आणि नवीनीकरणाच्या विकासकामासह परिसरात अंडरग्राऊंड पार्ंकग केली जात आहे. मात्र, या विकासकामात दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
दीक्षाभूमीच्या आजूबाजूला बरीच जागा आहे. तिथे बरेच अनुयायी तिथे येतात आणि बसतात. त्या जागेवर सरकार अंडरग्राउंड पार्किंग बांधत होते. या विकासकामात दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोप अनुयायी आंदोलकांनी केला.
त्यावेळी आज सोमवार 1 जुलैला बैठकीची तयारी दर्शविली होती. मात्र, शनिवार 29 जून रोजी समिती सदस्यांनी काही मान्यवरांशी या विषयावर चर्चा करून एनएमआरडीएसोबत भूमिगत वाहनतळाच्या पुनर्विचाराचे संकेत दिले. त्यानंतर सोमवारी अनुयायांनी दीक्षाभूमीवर बैठकीला येऊ नये, असे आवाहन केले होते.
हे पार्किंग धम्मचक्रप्रवर्तन दिनी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तत्काळ थांबवावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी स्मारक समितीच्या सदस्यांनी समाजाच्या अनुयायांसोबत या विषयावर चर्चा केली होती.
आज काही सदस्य समितीला भेटतील अशी तयारीही दर्शविली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक संघटना आणि अनुयायांनी समाजमाध्यमांवर ‘चलो दीक्षाभूमी’ असा नारा देत दीक्षाभूमीवर येण्याचे आवाहन केले आहे. यामुळे आज शेकडो बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर जमाव केला.