लडाखमध्ये चीनच्या सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा पूर्व लडाख येथील पँगाँग लेकच्या तीरावर उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 14 हजार 300 फूट उंचीवर आहे. हिंदुस्थान-चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलएसी) हा परिसर जवळच आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा म्हणजे हिंदुस्थानी लष्कराने चीनला दिलेला अप्रत्यक्ष इशाराच आहे.

लष्कराच्या 14 कॉर्प्सचे (फायर ऍण्ड कॉर्प्स) जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. द मराठा लाइट इन्फंट्री आणि लष्कराच्या 40 कॉर्प्सने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे वीरता, दूरदृष्टी आणि दृढ न्याय यांचे प्रतीक आहेत. त्यांचे महान कार्य लष्करासाठी, अनेक पिढय़ांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे 14 कॉर्प्सने ‘एक्स’द्वारे म्हटले आहे. 14 कॉर्प्सने अनावरणाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

असे आहे महाराजांच्या पुतळ्याचे महत्त्व

पँगाँग लेकच्या तीरावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्याचे विशेष महत्त्व आहे. हिंदुस्थान-चीनच्या ‘एलएसी’पासून जवळच आहे. अनेक वेळा दोन्ही देशांमध्ये संघर्षाची सुरुवात येथूनच झाली आहे. 2000चा सशस्त्र संघर्ष पँगाँग सरोवराच्या परिसरात झाला होता.