छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबई विमानतळावर बसवणार, स्थानीय लोकाधिकार समितीच्या दणक्यानंतर ‘अदानी’ व्यवस्थापन ताळय़ावर

शिवसेनाप्रणीत एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या दणक्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेट नंबर 5 येथे सुशोभिकरण करून बसवण्यात येईल, असे ठाम आश्वासन ‘अदानी’ एअर इंडिया इंटरनॅशनल प्रशासनाकडून देण्यात आले आहे. याबाबत शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांनी शिष्टमंडळासह इंटरनॅशनल एअरपोर्ट व्यवस्थापनावर धडक देताच प्रशासनाने समितीच्या मागण्या मान्य केल्या.

एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने 1987 मध्ये बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अदानी व्यवस्थापनाने काढून टाकला होता. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तो पुन्हा त्याच जागेवर बसवून जोपर्यंत योग्य ठिकाणी पुतळय़ाचे पुनर्स्थापना होत नाही तोपर्यंत सदरील जागेवरील पुतळा अदानीला हलवू देणार नाही अशी भूमिका एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने घेतली होती, मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले. याबाबत शिवसेना नेते, सचिव खासदार अनिल देसाई यांनी अदानी व्यवस्थापनाला पत्र लिहून अदानी व्यवस्थापनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यामुळे हादरलेल्या अदानी व्यवस्थापनाने सोमवारी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महासंघाचे कार्याध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस, सरचिटणीस प्रदीप मयेकर, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत व भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत खासदार अनिल देसाई यांनी अदानी प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर अदानी व्यवस्थापनाचे सीईओ विष्णू झा यांनी बैठकीनंतर लँड मॅनेजर राज सेठ यांच्यासह महासंघाचे शिष्टमंडळसोबत पुतळ्याच्या जागेची पाहणी केली. अदानी व्यवस्थापनाने यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेट नंबर 5 येथे सुशोभिकरण करून अतिशय चांगल्या प्रकारे बसवण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले व याच ठिकाणी समितीला ऑफिसदेखील देण्याचे मान्य केले आहे.

कामगारांवरील अन्याय थांबवा, अन्यथा आंदोलन 

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसचे जनरल मॅनेजर जयगोपाल यांची भेट घेऊन कामगारांवरील होणारे अन्याय थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने समाचार घेतला जाईल, असा इशारा दिला.  एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीची अदानीला दिलेल्या दोन ऑफिसमधील एक ऑफिस समितीला देण्याची मागणी केली. यावेळी गेट नंबर 5 जवळच समितीला ऑफिस देण्याचेही प्रशासनाने मान्य केले. यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे संघटन सचिव दिनेश बोभाटे, उपाध्यक्ष उल्हास बिले, प्रदीप बोरकर, चिटणीस बाळासाहेब कांबळे, संदीप गावडे, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत, प्रवीण शिंदे, दीपक शिंदे, अमोल कदम, प्रवीण जाधव, अजित चव्हाण, सतीश शेगले, संतोष कदम, राजा ठाणगे, सूर्यकांत पाटील उपस्थित होते.