महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना, निवडणूक आयोगावर जितेंद्र आव्हाड यांची टीका

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालात ईव्हीएम मशिन्स हॅक करून मतांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेरीत असलेल्या तफावतवरून निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

‘एक्स’वर एक पोस्ट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना. निवडणूक आयोगानुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.02 टक्के होती. साधे गणित आहे – 65.02 टक्के ऑफ 9,64,85,765 = 6,27,35,044.4. परंतु निवडणूक आयोगाने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त 13,53,151 मते आहेत. इतकेच नाही, तर 65.02 टक्के केल्यास त्यात 0.4 मतं असं गणित येतं. राज्यातच काय, संपूर्ण विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात? 3 लाख अतिरिक्त मते आली कुठून?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

आव्हाड म्हणाले, ”आता मतदार नोंदणी पाहू. 2019 ते 2024 (5 वर्षे) महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 50 लाखांनी वाढली, म्हणजे सरासरी प्रतिवर्षी 10 लाख. पण 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या 6 महिन्यांत मतदारांची संख्या 42 लाखांनी वाढली. 6 महिन्यांत 42 लाख वाढ म्हणजे 84 लाख/वर्षाचा वाढीचा दर, जो गेल्या 5 वर्षांतील सरासरी वार्षिक दराच्या 8.4 पट आहे.”

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी दोन गंभीर प्रश्न विचारले आहेत. मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का?, निवडणूक आयोग चुकीचा किंवा फेरफार केलेला डेटा प्रकाशित करत आहे का?, असे दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. दोघांपैकी काही जरी झालं असेल, तरी हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करतोय, असंही ते म्हणाले आहेत.

13 लाख अतिरिक्त मते का आहेत? महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? ईव्हीएमचे स्वतंत्र ऑडिट केले जात आहे का?, हे निवडणूक आयोगाने आयोगाने स्पष्ट केले पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते म्हणाले की, ”लोकशाही ही लोकांच्या विश्वासावर अवलंबून असते. हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास त्यावरून नक्कीच विश्वास उडेल. मतदार नोंदणी आणि मतमोजणीत पारदर्शकता आणावी, अशी आमची मागणी आहे. लपवण्यासारखे काहीही नसेल, तर निवडणूक आयोगाने या तपासणीचे स्वागत केले पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या पायाचे रक्षण करण्याची प्रचंड गरज आज आहे.”