
देशभरात शेतकरी आंदोलनाची धग पोहचली असून, भांडवलदारधार्जिण्या केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त होत आहे. यादरम्यान 8 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा दिला असून, यापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सर्व शेतीमालाची खरेदी हमीभावाने होईल, असे ते राज्यसभेत म्हणाले.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यसभेत शुक्रवारी प्रश्नोत्तरांच्या तासात हमीभावावरील प्रश्नाला उत्तर दिले. पंजाब, हरयाणा सीमेवर शेतकऱयांचे आंदोलन पेटले असताना त्यांनी हमीभावाने शेतमाल खरेदीची माहिती दिली. शेतकऱयांच्या आंदोलनातील हमीभाव ही मुख्य मागणी आहे. ज्या वेळी विरोधक सत्तेत होते, तेव्हा त्यांनी एम. एस. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारू शकत नाही, असे सांगितले होते. गहू, ज्वारी, सोयाबीन उत्पादन किमतीहून अधिक 50 टक्के रक्कम देऊन तीन वर्षांपासून खरेदी केले जात आहेत, असेही ते म्हणाले.