वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीच्या विरोधात सर्व पक्षीयांचे देवळाली नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीच्या विरोधात देवळाली प्रवरा येथील महाविकास आघाडीसह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आज गुरुवारी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना निवेदन दिले.

याबाबत मुख्याधिकारी नवाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, वाढीव दराने घरपट्टी तसेच पाणीपट्टी बिले देण्यास सुरवात केली आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात द्यावयाची ही देयके चार महिने उशिराने देण्यात आली आहेत. तसेच गेले आर्थिक वर्ष संपण्याअगोदर पुर्नमुल्यांकन करुन वाढीव बिले देणे अभिप्रेत असताना चक्क दीड वर्ष उशीराने हि बिले देण्यात आली आहेत. नगरपरिषदेने घरपट्टीमध्ये सरसकट 20% टक्के वाढ दर्शवली आहे. तसेच गेल्या वर्षीचे 20% टक्के थकबाकी चालु बिलात टाकुन जवळपास 40 टक्के रकमेची वाढीव बिले देण्यात आली आहेत. या वाढीव दरांचा शिक्षणकरासारख्या इतर उपकरांतहि वाढ केली गेली आहे. एकुण वाढ विचारात घेतली तर जवळपास दीडपट सरासरी बिले नागरिकांना भरावी लागणार आहे.नगरपरिषदेत शिक्षणमंडळ अस्तित्वात नाही. नगरपरिषद कोणतीही शैक्षणिक सुविधा देत नाही. तर हा शिक्षणकर वसुल करणे योग्य आहे का? रोजगार हमीची कामे नागरी भागात सुरु नसताना तो ही कर आकारणे संयुक्तीक नसल्याचे म्हंटले आहे.शेजारच्या राहुरी नगरपरिषदेने कोणतीही वाढ केलेली नाही. तसेच त्यांचे पाणीपट्टी दर रुपये 1650 असुन आपली पाणीपट्टी 1800 आहे. दोन्ही नगरपरिषदेची भौगोलिक परिस्थिती एक असुन ती नगरपरिषद डिस्पॅच लिपिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तसेच शिक्षण तसेच आरोग्याच्या सुविधा पुरवते. देवळाली प्रवरा मात्र सुविधा पुरवत नाही. वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी त्वरित मागे न घेतल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी दत्तात्रय कडू, नानासाहेब कदम,वैभव गिरमे,दीपक पठारे, कृष्णा मुसमाडे, कुणाल पाटील, वैभव गिरमे, भागवत मुंगसे, अनिल चव्हाण,शंकर मुसमाडे,प्रभाकर कांबळे आदिंसह कार्यकर्तेउपस्थित होते.

घरपट्टीचे दर चार वर्षांनी पुनरमुल्यांकन केले जाते. पुनरमुल्यांकनातंर वाढ झालेल्या घरपट्टी संदर्भात घरमालकांनी अपिल दाखल केले होते. मुल्यनिर्धारण अधिकारी नगररचना विभाग यांनी सुनावणी घेतली आहे. प्रत्येक अपिल बाजु समजावून घेतली. घरपट्टी कमी करण्याचे आपिल फेटाळून लावले आहे.दर चार वर्षांनी घरपट्टीचे पुर्नरमुल्यांकन होवून घरपट्टीत वाढ होते.आलेल्या तक्रारीची दखल घेवून नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न राहिल.
विकास नवाळे, मुख्याधिकारी देवळाली प्रवरा नगर पालिका