‘शरबद जिहाद’ प्रकरणामुळे रामदेव बाबा अडचणीत, दिल्ली हायकोर्टाने फटकारले

योगगुरू रामदेव बाबा नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. पण यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रामदेव बाबा यांनी फेसबुक पोस्ट करत ‘शरबद जिहाद’चा उल्लेख केला होता. याविधानामुळे हमदर्द या सरबत बनवणाऱ्या कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे.

रामदेव बाबा यांच्या ‘शरबद जिहादी’ विधानावर उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. रामदेव बाबा यांचे विधान अयोग्य आहे आणि त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. आम्ही हा व्हिडिओ पाहिला तेव्हा आम्हाला आमच्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सुनावणीदरम्यान, हमदर्दच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. हे प्रकरण केवळ ‘रूहअफजा’ची प्रतिमा खराब करणारे आहे, हे जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकरण आहे. रामदेव बाबा यांच्या या विधानामुळे सामाजिक आणि सामाजिक सौहार्दावर परिणाम होणार आहे, असा युक्तिवाद वकिलाने केला.

दरम्यान, दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर आणि न्यायालयाने दिलेल्या टिप्पणीवर रामदेव बाबा यांनी आपले व्हिडीओ मागे घेण्याचे कबुल केले. मी यासंदर्भात आमच्या टीमसोबत बोलून आमचे व्हिडीओ काढून टाकत आहे. तसेच यासंदर्भातील जाहिरातीही काढून टाकणार असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

रामदेव बाबा यांच्या उत्तरावर न्यायालयाने पुढील 5 दिवसांत प्रतिज्ञापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यात भविष्यात आपण असे कोणतेही विधान, जाहिरात किंवा सोशल मीडिया पोस्ट जारी करणार नाही असे प्रतिज्ञापत्रात नमूद करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.