दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आजपासून राज्यव्यापी संघर्ष सप्ताह

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाच्या दुसऱया टप्प्याची आज घोषणा करण्यात आली

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यभर झालेल्या आंदोलनांचा आढावा घेऊन दुसऱया टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलनाच्या या टप्प्यामध्ये 15 ते 21 जुलै या आठवडाभराच्या कालावधीमध्ये राज्यभर स्थानिक पातळीवर तीव्र आंदोलन पुकारण्याची घोषणा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. 2009  पासून आजतागायत राज्यभर झालेल्या विविध आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या राज्यभरातील संघटना, नेते व कार्यकर्त्यांनी मिळून आकाराला आलेल्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्यभरातील 47 प्रमुख नेते, कार्यकर्ते व विचारवंतांनी सहभाग नोंदवला.

राज्यभर सुरू असलेल्या दूध आंदोलनामध्ये मागण्यांच्या पातळीवर व कृतीच्या पातळीवर समन्वय साधण्याचे काम दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू आहे. संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये आजवर झालेल्या आंदोलनांचा आढावा घेऊन आगामी काळात करावयाच्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.

नगर जिह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा नववा दिवस असूनही या आंदोलनाकडे सरकारने हेतूतः दुर्लक्ष चालवले आहे. राज्यभरात विविध ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रालयस्तरीय बैठकीतसुद्धा दूध उत्पादकांच्या मागण्या फेटाळून लावण्यात आल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर 15 ते 21 जुलै या कालावधीमध्ये संघर्ष समितीत सहभागी असणाऱया संघटना, नेते आणि कार्यकर्ते स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या आंदोलनांना चालना देणार आहेत. धरणे आंदोलने, दुग्धाभिषेक, दूध हंडी, दूध परिषदा, मोटारसायकल रॅली, पायी दिंडी, निदर्शने, लोकप्रतिनिधींच्या भेटी, लाक्षणिक उपोषणे व रास्ता रोकोच्या माध्यमातून सबंध आठवडाभर ठिकठिकाणी आपल्या मागण्यांकडे दूध उत्पादक सरकारचे लक्ष वेधणार आहेत. सबंध आठवडाभर तीव्र आंदोलने करूनही सरकारने जर मागण्यांची दखल घेतली नाही तर सर्व राज्यभरातील ताकद एकत्र करून जबरदस्त आंदोलनात्मक कृती राज्याच्या केंद्रस्थानी संघटित करण्यात येईल, असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.