एसटीचे गाळे घुसखोरांच्या ताब्यात; महामंडळाला 30 कोटींचा फटका

एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे सांगून जनतेच्या माथी भाडेवाढ मारणाऱ्या महायुती सरकारने एसटीच्या वाणिज्य आस्थापना घुसखोरांना आंदण दिल्या आहेत. आगारातील दुकान व हॉटेल गाळे, पान टपऱ्या मुदत संपूनही घुसखोरांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर निवासी उपजिल्हाधिकारी कारवाई करीत नसल्याने महामंडळाला 30 कोटींचा फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे. एसटीच्या स्वमालकीच्या मोकळ्या जागेत 3500 वाणिज्य आस्थापना म्हणजेच दुकान व हॉटेल गाळे व विविध वस्तू भांडार आहेत. प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे हा त्यामागील उद्देश आहे. असे असताना 677 गाळे विविध कारणांनी वर्षानुवर्षे भाडेतत्त्वावर दिलेले नाहीत. एकूण 2081 गाळ्यांपैकी 1880 गाळ्यांचे नियमित भाडे येत आहे. 201 गाळे रिकामे असून काही गाळे मुदत संपूनही गाळेधारकांनी सोडलेले नाहीत. त्यामुळे महामंडळाचे 30 कोटी रुपये बुडाले आहेत.