>>विठ्ठल देवकाते
खाशाबा जाधव या मऱहाटमोळय़ा मल्लाने 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करीत इतिहास घडविला. कारण स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानला मिळालेले हे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक होते. देशात क्रीडा संस्कृतीचा लवलेशही नव्हता. अशा प्रतिकूल काळात अडथळय़ांची शर्यत पार करून अन् जिवाचे रान करीत खाशाबांनी हा भीमपराक्रम केला होता, पण त्यांची ही कामगिरी दुर्दैवाने काळाच्या प्रवाहात लुप्त झाली होती. मात्र संजय दुधाणे नावाच्या क्रीडा लेखकाने लिहिलेल्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकामुळे खाशाबांच्या पराक्रमाला नुसती नवसंजीवनीच मिळाली नाही, तर या महान मल्लाची यशोगाथा अजरामरही झाली. 15 जानेवारी हा खाशाबांचा जन्मदिवस गेल्या वर्षापासून (2024) महाराष्ट्रात ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. उद्या, 15 जानेवारी रोजी या महान कुस्तीपटूची जन्मशताब्दी होय. खाशाबा जिवंत असते तर ते आज शंभर वर्षांचे झाले असते. या जन्मशताब्दीपूर्तीच्या निमित्ताने खाशाबा जाधव यांचे स्मरण करताना खरचं त्यांची एकूणच कहाणी ही एखाद्या शापित गंधर्वासारखी आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागतेय.
1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहाव्या स्थानावर राहिल्याने निराश झालेल्या खाशाबा जाधव यांनी आगामी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या ध्येयाने सरावाला प्रारंभ केला, मात्र ऑलिम्पिक निवड चाचणीत त्यांना मुद्दाम एक गुण देऊन खाशाबांचा पत्ता कट करण्यात आला होता. या अन्यायाविरुद्ध शड्डू ठोकून खाशाबांनी पुन्हा झालेल्या निवड चाचणीत ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले. तुटपुंजी लोकवर्गणी… प्राचार्य दाभोळकरांनी लाडक्या खाशाबांसाठी स्वतःचा बंगला गहाण ठेवण्याचा घेतलेला निर्णय… मुख्याध्यापक वळवडे सरांनी दिलेला तीन महिन्यांचा पगार… पुरंदरे सरांनी कर्ज काढून दिलेले तीन हजार रुपये… सरावाबरोबरच उन्हातान्हात फिरून खाशाबांनी अखेर पैशांची जुळवाजुळव करून 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकच्या स्वारीवर कूच केली. चार कुस्त्या जिंकून खाशाबा अंतिम टप्पात पोहोचले होते. संघव्यवस्थापक दिवाण प्रतापचंद यांनी आज तुझी कुस्ती नाही, असे खाशाबांना सांगितले, मात्र इतरांच्या कुस्त्या बघण्यासाठी गेल्यानंतर खाशाबांच्या नावाचा पुकार झाला. घाईघाईने मैदानावर आलेल्या खाशाबांचा या लढतीत पराभव झाला. रशियन लॉबीकडूनही या मराठमोळय़ा मल्लावर अन्याय झाला. दोन कुस्तीतील तीन मिनिटांचे अंतर असा नियम असतानाही खाशाबांना थकलेल्या अवस्थेत कुस्ती खेळावी लागली. शेवटी या झुंजार मल्लाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, मात्र खाशाबांसाठी हे कांस्यपदक सुवर्णपदकाहून नक्कीच कमी नव्हते.
मायदेशात परतल्यानंतर खाशाबा जाधव यांची कराड ते त्यांचे जन्मगाव गोळेश्वरपर्यंत शेकडो बैलगाडय़ांच्या गराडय़ात ढोलताशांच्या दणदणाटात जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास घडविणाऱया खाशाबांना नंतर शासकीय नोकरीसाठीही तब्बल सहा वर्षे वाट पहावी लागली. अखेर पोलीस दलात नोकरी मिळाली, पण तेथेही प्रमोशनमध्ये वेळोवेळी खाशाबांवर अन्यायच झाला. मुंबईच्या पोलीस खात्यात त्यांनी 28 वर्षे निष्कलंक सेवा केल्यावर वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्याने 1983 साली ते निवृत्त झाले आणि मुंबईचा निरोप घेऊन ते आपल्या पत्नी-मुलासह त्यांच्या मूळ गावी परतले. 14 ऑगस्ट 1984 चा दिवस होता. खाशाबा काही कारणास्तव कराडला किंवा अन्य कुठेतरी मित्रासोबत बाहेर गेले होते. मात्र दुचाकीचा अपघात होऊन खाशाबांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि मेंदुतून रक्तस्राव सुरू झाला. उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडला. वयाची केवळ 59 वर्षे पूर्ण करून साठीकडे दमदारपणे वाटचाल करत असलेल्या या उमद्या ऑलिम्पिकवीराचा अंत असा अनपेक्षितपणे एखाद्या अपघातात व्हावा हे देशाचे निव्वळ दुर्दैवच म्हटले पाहिजे.
खाशाबा जाधव हयात असताना दुर्दैवाने त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल फारशी घेतली गेलीच नाही. वास्तविक ‘पद्म’ पुरस्कार द्यायला जेव्हा 1954 साली सुरुवात झाली तेव्हा खाशाबा यांच्या ऑलिम्पिकमधल्या विक्रमाची घटना अगदी ताजी होती. त्यामुळे तेव्हाच त्यांना यथायोग्य ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित केले असते तर ते समयोचित झाले असते. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार’ 1992 साली जेव्हा दिला तेव्हा खाशाबा यांचे निधन होऊन आठ वर्षे उलटली होती. पेंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे 2000 साली त्यांना ‘मरणोत्तर अर्जुन’ पुरस्कार देऊन गौरवान्वित केले तेव्हा तो पुरस्कार त्यांच्या विधवा पत्नी कुसुम जाधव यांनी स्वीकारला होता. खाशाबा जाधव यांनी 1952 साली हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत मिळवलेल्या कांस्यपदकानंतर तब्बल 44 वर्षांनी, 1996 साली लिएंडर पेस याने अॅटलांटा ऑलिम्पिकमध्ये टेनिस (पुरुष) गटाच्या एकेरी सामन्यात कांस्य पदक मिळवले. त्या दरम्यानच्या 44 वर्षांच्या काळात वैयक्तिक ऑलिंपिक मेडल मिळालेले खाशाबा दादासाहेब जाधव हेच एकमेव हिंदुस्थानी खेळाडू होते, मात्र याची जाण आणि याचे भान ‘पद्म’ पुरस्कार निवड समितीच्या कुणालाही असू नये, याहून दुर्दैव ते काय?
खाशाबा हयात असताना 1982 साली दिल्लीला झालेल्या आशियाई देशांच्या क्रीडा स्पर्धेत, एशियाडमध्ये स्पर्धेची मशाल हाती घेण्याचा मान त्यांना जरूर मिळाला होता, परंतु त्याचे निमंत्रण त्यांना अगदी ऐनवेळी मिळाले होते. ते हयात नसताना 2010 साली दिल्लीतच झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या क्रीडा स्पर्धेत, इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या ज्या हॉलमध्ये कुस्तीच्या स्पर्धांचे आयोजन केले होते त्या हॉलला खाशाबांचे नाव दिले होते. पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात अॅथलेटिक्स स्टेडियमच्या एका प्रवेशद्वाराला त्यांचे नाव दिलेले आहे. पुणे विद्यापीठाच्या विस्तीर्ण क्रीडा संकुलाच्या जमिनीवर खाशाबा यांचा ब्राँझचा पुतळा स्थापित केलेला आहे. प्रतिवर्षी पुणे विद्यापीठातल्या सर्वोत्तम महिला आणि सर्वोत्तम पुरुष खेळाडूला खाशाबा जाधव ट्रॉफी दिली जाणार आहे. खाशाबा जाधव यांचे नाव पुण्यातल्या एका रस्त्याला दिलेले आहे. खाशाबांच्या जन्मगावी गोळेश्वरला त्यांच्या नावाने साकारत असलेल्या क्रीडा संकुलासाठी अनेक विघ्ने आली. त्यांच्या स्मृती जागवणारी अशी काही दृश्य स्वरूपातली अपवादात्मक उदाहरणे सांगता येत असली तरी यंदाच्या प्रजासत्ताक दिनी खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जन्मशताब्दीचा सुमुहूर्त साधून पेंद्र सरकारने त्यांना यथायोग्य ‘मरणोत्तर पद्म पुरस्कार’ जाहीर केला तर तो निश्चितच दुग्धशर्करा योग ठरेल.