राज्य सेवा परीक्षेचे प्रवेशपत्र एमपीएससीकडून ऑनलाइन उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 1 डिसेंबर रोजी होणाऱया राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी उमेदवाराचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी घेतली जाणार होती. परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्रे वितरित करण्यात आली होती. मात्र, 1 डिसेंबर रोजी होणाऱया परीक्षेला उमेदवारांना जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

एमपीएससीने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱया अडचणी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात एमपीएससीची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळण्यासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षेवेळी उमेदवारांनी एमपीएससीच्या मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर एमपीएससीच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची, प्रचलित नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.