
मुंबईत वायू प्रदूषणाची वाढणारी पातळी लक्षात घेऊन अधिकाधिक मोकळय़ा जागा, मैदाने आणि उद्यानाला प्राधान्य देण्यासाठी शिवसेनेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कालिना विधानसभेतील वाकोला पाईपलाईन येथे मुंबई महापालिकेच्या सहाय्याने अत्याधुनिक उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाचे लोकार्पण शनिवार, 1 मार्चला करण्यात येणार आहे. उद्यानामुळे वाकोला येथील रहिवाशांना मोकळा श्वास घेता येणार आहे. दरम्यान, शिवसेना आमदार संजय पोतनीस यांच्या देखरेखीखाली संपूर्ण उद्यानाचे कामकाज करण्यात आले आहे.
कालिना विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. 91 मधील महापालिका एच-पूर्व विभागात येणाऱ्या वाकोला पाईपलाईन रोडजवळील ग्रॅण्ड हयात हॉटेलच्या शेजारी महापालिकेच्या उद्यान पायाभूत सुविधा कक्षामार्फत अत्याधुनिक सुविधा असलेले उद्यान उभारण्यात आले आहे. लहानमोठय़ांना खेळांसह आरोग्य राखण्यासाठी तसेच थोडा विसावा घेऊन निवांतपणे काही क्षण घालवण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.
अशा आहेत सुविधा
नवीन पदपथ, आरामदायी आसन व्यवस्था, भिंतीवर कलात्मक चित्रे, व्यायाम व खेळासाठी साहित्य अशा अत्याधुनिक सोयीसुविधा उद्यानात देण्यात आल्या आहेत.