
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार बंद करण्यात आलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर पुढील 15 वर्षे कोणतेही बांधकाम करता येत नाही, मात्र अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय प्रदूषण मंडळाचे हे नियम राज्य आणि महापालिकेने पायदळी तुडवले आहेत. याबाबत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर देवरे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मुंबईतील मोक्याच्या जागा हडपण्याचा प्रयत्न अदानी समूहाकडून करण्यात येत आहे. यात देवनार डम्पिंग आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा समावेश असून ही जागा राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अदानीला देणार आहे. डम्पिंग ग्राऊंडची ही जागा हजारो कोटी रुपये खर्च करून राहण्याजोगी करण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली आहे. देवनारबरोबर मुलुंड डम्पिंग ग्राऊंडसुद्धा याच प्रकल्पाला देण्याचा घाट घातला जात असून त्याचीही प्रक्रिया सुरू आहे, असा आरोप देवरे यांनी केला आहे.
डम्पिंग ग्राऊंड अदानीला देण्याचा निर्णय रद्द करा!
राज्य सरकार आणि मुंबई महापालिका आयुक्तांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करत देवनार डम्पिंग ग्राऊंड धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा तसेच मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर पुढील 15 वर्षे कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला मनाई करावी. त्याचबरोबर डम्पिंग ग्राऊंडच्या 500 मीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करावा, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड येथे बिल्डरधार्जिणे गोल्फ कोर्स न करता न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उभारावे, अशी मागणी सागर देवरे यांनी राज्य आणि मुंबई महापालिकेकडे केली आहे.