राज्याच्या गृहमंत्रालयाची नाचक्की; कॅटच्या आदेशानंतर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पदभार न स्वीकारताच परतले

राज्याचे गृहमंत्रालय तोंडावर आपटले असून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) याचिका दाखल केली होती. त्यात 19 जुलैच्या सुनावणीपर्यंत कुणालाही पदभार देऊ नये, असे आदेश दिल्याने त्यांच्या जागेवर बदलीवर आलेल्या पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना आल्यापावली पदभार न स्वीकारताच परतावे लागले आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या काही बदल्यांच्या आदेशाचे चांगलेच हसे झाले आहे. तसेच यामुळे गृहमंत्रालय तोंडावर आपटले.

राज्य सरकारने राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाला आयपीएस व आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार आहेत. तर पोलीस महासंचालक कार्यालय हे पोलीस उपअधीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचे आदेश जारी करु शकते. त्यांना हे अधिकार आहेत. नुकत्याच झालेल्या बदल्यात शासनाच्या गृहमंत्रालयाने सहा भारतीय पोलीस सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्या करुन त्यांना नविन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची बदली गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे करण्यात आली. तर त्यांच्या जागी नुकतीच पदोन्नती झालेल्या मुंबईच्या विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांची पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती केली.

वास्तविक 24 एप्रिल 2023 रोजी पोलीस महानिरीक्षक असलेल्या शशिकांत महावरकर यांची पदोन्नती करुन त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर बढती देत नांदेडच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर कायम केले. पाच दिवसापूर्वी राज्याच्या गृहमंत्रालयाने सहा भारतीय पोलीस सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. त्यात महावरकर यांची पुणे येथे तर त्यांच्या जागी हे पद अवनवत करुन पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या शहाजी उमाप यांची बदली करण्यात आली.

विशेष म्हणजे एक वर्षापूर्वीच पदोन्नती मिळालेल्या पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांना कुठलीही विचारणा न करता त्यांची बदली करण्यात आली. नियमानुसार त्यांना आणखी दोन वर्ष बदलता येत नाही. याच तांत्रिक मुद्याचा आधार घेत त्यांनी 11 जुलै रोजी केंद्राच्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) आपल्या विरुध्द झालेल्या अन्यायाबाबत रितसर याचिका दाखल केली. उपलब्ध कागदपत्रे आणि बदल्यांचे आदेश व तांत्रिक बाबीचा आधार घेत कॅटने 19 जुलैपर्यंत त्यांच्या बदलीला स्थगिती देवून कुणालाही पदभार देऊ नये, १९ जुलैला याबाबतची परत सुनावणी होईल, असे आदेश दिले.

काही भाजपच्या नेत्यांनी उमाप यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती, अशीही माहिती मिळाली आहे. उमाप यांनी यापूर्वी नांदेड येथे काम केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची हि नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. उमाप हे नांदेडात शुक्रवारी दुपारी दाखल झाले. मात्र, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून या स्थगितीची माहिती देण्यात आली. सायंकाळी साडेपाचनंतर त्याबाबतचे आदेशही त्यांना पाठविण्यात आले. पदभार स्वीकारण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचलेल्या शहाजी उमाप यांना पदभार न स्विकारताच माघारी परतावे लागले. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्रालयाची चांगलीच नाचक्की झाली. ज्या सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यातील आणखी तिघांवर अशाच प्रकारे अन्याय झाल्याने त्यातील दोघेजण कॅटमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियम, अटी, तांत्रिक मुद्दे याचा विचार न करता गृहमंत्रालयाने केलेल्या या बदल्या त्यांना चांगल्याच पथ्यावर पडल्या असून यामुळे गृहमंत्रालयाची नाचक्की झाली आहे. शनिवारी दुपारी शहाजी उमाप हे पदभार न स्विकारता मुंबईकडे परतले.