राज्य कबड्डीची निम्मी लढाई बिनविरोध; कार्याध्यक्षपदी अमोल कीर्तिकरांची निवड

क्रीडा संहितेची पायमल्ली करत होत असलेली महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची चौवार्षिक निवडणूक निम्मी बिनविरोध झाली. राज्य कबड्डीवर अनेक वर्षे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी या निवडणुकीतून अंग काढले असले तरी पुण्याचेच अतुल बेनके अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच मितभाषी असलेल्या मुंबई उपनगरच्या अमोल कीर्तिकरांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून कबड्डीचे अस्सल खेळाडू-कार्यकर्ते असलेले मंगल पांडे हे सरकार्यवाहपदी विराजमान झाले आहेत. या तीन पदांसह राज्य कबड्डीच्या खजिन्याची किल्ली नाशिकच्या मोहन गायकवांडाकडे बिनविरोध आली आहे. महत्त्वाची ही चार पदे बिनविरोध निवडून आली असली तरी उपाध्यक्ष, सहकार्यवाह आणि कार्यकारिणी सदस्य पदाच्या 18 जागांसाठी निवडणूक होईल. मात्र 16 जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्यक्षात 18 जागांसाठी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात टिकतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

क्रीडा संहितेतील नियम फाटय़ावर मारत होत असलेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत महत्त्वाच्या पदांसाठी एकेकच अर्ज आल्यामुळे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरकार्यवाह आणि खजिनदार हे पद बिनविरोध निवडून आल्याची माहिती निवडणूक अधिकारी दिलीप जोशी यांनी दिली. या निवडणुकीत विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचाही उमेदवारी अर्ज आल्याची चर्चा होती, पण तसे काहीही झाले. मावळत्या कार्यकारिणीत ते उपाध्यक्ष होते. या निवडणुकीत त्यांना अध्यक्षपदी बढती मिळणार असे संकेत दिले जात होते, पण त्यांनीही अजित पवारांप्रमाणे राज्य कबड्डीच्या निवडणुकीपासून स्वतःला दूरच ठेवले. मात्र अजित पवारांचे निकटवर्तीय आणि जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी पुण्याचे अध्यक्षपद मिळवल्यानंतर राज्य कबड्डीचे अध्यक्षपदही काबीज केले आहे. त्यामुळे राज्य कबड्डीचे अध्यक्षपद पुण्याकडेच कायम राहिले आहे. मुंबई उपनगरचे अध्यक्ष असलेले अमोल कीर्तिकर हेसुद्धा कार्याध्यक्ष म्हणून बिनविरोध आल्याने उपनगरनेही आपले वर्चस्व कायम राखले आहे.

खेळाडू ते सरकार्यवाह
खेळाडू, पंच, प्रशिक्षक, निरीक्षक, आयोजक, सहकार्यवाह, खजिनदार अशा विविध भूमिका पार पाडणारे मंगल पांडे यांनी अखेर राज्य कबड्डीच्या सरकार्यवाहपदी झेप घेतली. परभणीतील कबड्डीचे आधारस्तंभ असलेल्या पांडेनी आपल्या जोरदार खेळाच्या जोरावर शिवछत्रपती पुरस्कारही पटकावला.

उपाध्यक्षपदासाठी कांटे की टक्कर
महत्त्वाची पदे बिनविरोध झाल्यामुळे आता उपाध्यक्षपदाकडे साऱयांचे लक्ष लागले आहे. उपाध्यक्षपदाच्या 5 जागांसाठी 11 उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे इथे कांटे की टक्कर अपेक्षित आहे, पण सहा जणांनी माघार घेतल्यास ही निवडणूकही बिनविरोध होऊ शकते. उपाध्यक्षपदासाठी दिनकर पाटील, देवेश पाथ्रीकर, अमरसिंह पंडित, सचिन कदम, भाई जगताप, विश्वास मोरे, बाबुराव चांदेरे, रमेश भेंडगिरी, बाबासाहेब पाटील, मुझफ्फरअली सय्यद आणि कृष्णा पाटील हे तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात असून यापैकी किती उमेदवार अर्ज मागे घेतात, हे 16 जुलैलाच कळेल. तसेच सहकार्यवाहच्या 5 पदांसाठी नितीन शिंदे, प्रशांत तेलगड, नितीन बरडे, नवनाथ लोखंडे, अनिल जाधव आणि रवींद्र देसाई हे 8 उमेदवार उभे आहेत.