Nanded: राज्य सरकारची मुख्यमंत्री ‘योजनादूत’ बारगळली; साडेचारशे नियुक्त्या रद्द

CM Yojana Doot

राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व ग्रामीण भागापर्यंत पोहचण्यासाठी जुलै महिन्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योजना दूत ही योजना पदवीधारकांसाठी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ही योजना आता सरकारने गुंडाळली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, नियुक्ती दिलेल्या साडेचारशे उमेदवारांच्या नियुक्त्या सरकारने रद्द केल्या आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर लाडके भाऊ नाराज झाल्याने राज्य शासनाने जुलै महिन्यात तत्कालीन उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात ही योजना जाहीर केली होती. त्यानंतर त्याचा शासन आदेश काढण्यात आला. 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2024 या दरम्यान, ई-मेलवर हे अर्ज करावयाचे होते.

महाराष्ट्रातील 50 हजार पदवीधर युवकांना या माध्यमातून रोजगार मिळणार होता. 18 ते 35 वयोगटातील पदवीचर युवकांनी यासाठी अर्ज करायचे होते. यानंतर अर्ज आल्यानंतर त्यांच्यासोबत सहा महिन्यांचा करार करून त्यांना प्रतिमहा दहा हजार रुपये मानधन देण्याचे ठरविण्यात आले होते. आधारकार्ड, पदवीधर असल्याचे पुरावे, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, दोन फोटो, हमीपत्र आदी कागदपत्रे यासोबत जोडण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. या मोहिमेतंर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामपातळीवर जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार होती. दरदिवशी केलेल्या कामाची माहिती विहित नमुन्यात शासनाच्या पोर्टलवर टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. यासंदर्भात त्यांच्यासोबत करारही करण्यात येणार होता. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या अजांची छाननी होऊन त्याबाबत शासनास अहवाल पाठवून या योजनादूतांना सहा महिन्यांसाठी करारबध्द करण्यात येणार होते. 7 ते 13 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने हे अर्ज मागविण्यात आले.

राज्यभरातून जवळपास अडीच लाख अर्ज यासाठी आले, त्यानंतर निवडणुका लागल्या. त्यादरम्यान आचारसंहिता लागली होती. त्याअगोदर 427 जणांना याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. आता या सर्वांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले असून, माहिती विभागाच्या मुंबई येथील एका वरिष अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला आहे. याबाबत आता ही योजना पुढे चालू राहणार की बंद राहणार, याबाबत कुठलेही आदेश नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ज्या 427 जणांचे अर्ज मंजूर करून त्यांना नियुकाया देण्यात आल्या त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. अडीच लाख अर्ज यासाठी प्राप्त झाले होते. सबंध राज्यातून अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती, मात्र आता या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याने नव्या सरकारने ही योजना रद्द केली काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. नांदेड जिलहधातून मोजना दूत योजनेसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, एकाचीही नियुक्ती करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांना व बेरोजगारांना खूश करणारी ही योजना अखेर बारगळल्याचे समोर आले आहे.