>>विठ्ठल देवकाते
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा गोरखधंदा… खेळाडूंच्या वयचोरीकडील दुर्लक्ष… शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार निवडीतील वाद… राज्य क्रीडा संघटनांमधील दुफळी… आणि अलीकडेच छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने मारलेला 21 कोटींचा डल्ला… अशा अनेक वादग्रस्त कारणांनी महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय ढवळून निघाले आहे. मात्र, या गंभीर विषयांकडे लक्ष देण्याऐवजी राज्य सरकारने क्रीडा आयुक्तांच्या बदलीची जणू संगीत खुर्ची सुरू केली आहे. कारण वर्षभरात महाराष्ट्रावर तब्बल चार क्रीडा आयुक्त लादण्यात आले असून, यातील अखेरचे दोन क्रीडा आयुक्त तर आपल्या खुर्चीवर किती दिवस बसले असतील हा वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
राज्य सरकारने गतवर्षी लोकसभा निवडणुकीच्या आधी फेब्रुवारीमध्ये वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या व्यापक प्रमाणात बदल्या केल्या. त्यावेळी क्रीडा आयुक्त असलेले सुहास दिवसे व पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले डॉ. राजेश देशमुख यांच्यात खांदेपालट झाला. म्हणजेच सुहास दिवसे पुण्याचे जिल्हाधिकारी झाले, तर डॉ. राजेश देशमुख हे राज्याचे नवे क्रीडा आयुक्त बनले. मात्र, राजेश देशमुख यांची आठ-नऊ महिन्यांतच क्रीडा आयुक्तपदावरून बदली करण्यात आली. ऑक्टोबर 2024मध्ये त्यांच्या जागेवर राज्याचे तत्कालीन शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नवे क्रीडा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. मात्र, हे नवे क्रीडा आयुक्त जेमतेम अडीच महिनेच या पदावर राहिले.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा बदल्या
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनातही फेरबदलाची प्रक्रिया सुरू झाली. यात 31 डिसेंबरला सूरज मांढरे यांची कृषी आयुक्तपदी बदली झाली, तर त्यांच्या जागेवर हीरालाल सोनवणे हे नवे क्रीडा आयुक्त झाले. एक तर क्रीडा आयुक्त पदासाठी सनदी अधिकारी फारसे उत्सुक नसतात. आतापर्यंत झालेले काही मोजके क्रीडा आयुक्त वगळता इतर क्रीडा आयुक्त साधी पत्रकार परिषदही घेत नाहीत हा इतिहास आहे. आता हीरालाल सोनवणे या नव्या क्रीडा आयुक्तांचा कार्यकालही औटघटकेचा ठरू नये एवढीच राज्याच्या क्रीडाक्षेत्राला अपेक्षा आहे.