
आमच्याकडे पैशांची चणचण आहे. तरीही माहिती आयुक्तांची अतिरिक्त पदे तयार करण्याचा सकारात्मक विचार करू, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आहे. माहिती आयोगाचे कामकाज अधिक चांगले करताना आर्थिक सावधगिरीलाही प्राध्यान्य दिले पाहिजे. त्यामुळे मंजूर पदे भरण्यावर व आयोगाच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.
माहिती आयुक्तांची अतिरिक्त तीन पदे तयार करावीत, अशी मागणी शैलेश गांधी यांनी याचिकेद्वारे केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी सरकारी वकील ज्योती चव्हाण यांच्यामार्फत याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.
माहिती आयुक्त पदासाठी 36 अर्ज
मुख्य माहिती आयुक्त व सात माहिती आयुक्त, अशी मंजूर पदे आहेत. यातील मुख्य माहिती आयुक्तांसह माहिती आयुक्तांची तीन पदे रिक्त आहेत. मुख्य आयुक्त पदासाठी 36 अर्ज आले आहेत. माहिती आयुक्त पदासाठी 117 अर्ज आले आहेत. येत्या दोन महिन्यांत ही पदे भरली जातील, अशी हमी देण्यात आली आहे.