
विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी असलेली सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. गडावरील अतिक्रमणे तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले होते, पण सध्या कारवाई थांबल्याने सरकारने हे आदेश दिले आहेत.
विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱयांना हे आदेश दिले. त्यावर महिनाभरात विशाळगड परिसरातील सर्व अतिक्रमणे हटवली जातील, असे कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
विशाळगड आणि पायथ्याशी 157 अतिक्रमणे झालेली आहेत. ती काढण्यासाठी निधी वर्ग केला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने 90 अतिक्रमणे तोडली आहेत, परंतु मलिक ए रेहानच्या कबरीवर बांधलेले बेकायदेशीर बांधकाम, दर्ग्याभोवतालची बांधकामे व गडाच्या पायथ्याशी झालेली बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची मोहीम सुरू झाली असताना काहींनी न्यायालयामध्ये धाव घेतली. यावर न्यायालयाने सध्या कारवाई थांबवून पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी, असा निकाल दिला होता.
आता हिवाळा संपत आला तरीही कोल्हापूर जिल्हा प्रशासन या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहे. याविरोधात विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीने निदर्शने करून कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांना निवेदनही दिले होते. यामुळे आपण स्वतः जिल्हाधिकाऱयांना अतिक्रमण तोडण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती माजी आमदार शिंदे यांनी यावेळी केली होती. त्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी तत्काळ कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधला आणि विशाळगडच्या अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करावी, असे निर्देश दिले. त्यावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांनी एक महिन्याच्या आत विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवली जातील, असे स्पष्ट केले.