राष्ट्रीय महामार्ग 166 रत्नागिरी-नागपूरमधील चोकाक ते उदगाव अंकली आणि राष्ट्रीय महामार्ग 166 एचमधील पेठनाका ते सांगली या मार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्यासंदर्भातील मागणीबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याबाबत आदेश दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग 166 रत्नागिरी-नागपूरमधील चोकाक ते अंकली (जि. सांगली) आणि राष्ट्रीय महामार्ग 166-एच पेठनाका ते सांगली या मार्गांच्या भूसंपादनासाठी शेतकऱयांना चौपट मोबदला द्यावा, अशी मागणी होत होती. या दोन्ही रस्त्यांसाठी असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूसंपादन कराव्या लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच आपल्याद्वारे करण्यात आलेल्या अलॉटमेंटमध्ये भर घालून रस्ता केल्यास महापुराचा व ठिकठिकाणी बॉक्स ओपनिंगमुळे नवीन निर्माण होणाऱ्या ओढ्यांचा त्रास आसपासच्या नागरिकांना व शेतीस होऊ शकतो. त्यामुळे या महामार्गास लागणारी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना जो मोबदला आहे, तो कायद्याप्रमाणे पूर्वीपेक्षा निम्मा म्हणजे गुणक 2 चा 1 करण्यात आला आहे. असे न होता शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची मागणी केली होती.
याबाबत शासनाने सचिव (महसूल व वने ) यांना तपासून सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याच्या अनुषंगाने भूसंपादन अधिनियम 2013 व त्या अनुषंगाने असणारे शासननिर्णय व परिपत्रके यानुसार तपासणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास तत्काळ सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाने जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना दिले आहेत.