टीबी प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण, राज्यात एक लाखांवर रुग्ण

क्षयरोगाच्या (टीबी) उच्चाटनासाठी केंद्र सरकारने 11 राज्यांमध्ये 18 वर्षांवरील नागरिकांना टीबी प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्रातही नागरिकांचे समुपदेशन करून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यात येईल, अशी माहिती राज्य शासनाने आज विधानसभेत दिली.

याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईसह महाराष्ट्रात टीबीचे रुग्ण वाढत असून त्यांना औषधे मिळत नसल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. मुंबईत दाट लोकसंख्येमुळे टीबी रुग्णांचे प्रमाण अधिक असून टीबीचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती महिनाभरात अभ्यास करून अहवाल सादर करेल, असे उत्तर त्यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार पृथ्वीराज चव्हाण, डॉ. नितीन राऊत, राजेश टोपे, रोहित पवार आदींनी भाग घेतला.