नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱयांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने अखेर मदत देण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील 5 लाख 30 हजार 45 शेतकऱयांना 535 कोटी 65 लाख 74 हजार 893 रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज दिली. गेल्या दोन वर्षांपासून ही भरपाई प्रलंबित होती.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले होते. पण निवडणूक आचारसंहिता व सरकार स्थापना, मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यामुळे शेतकऱयांना मदत मिळत नव्हती. त्यामुळे शेतकऱयांमध्ये रोष निर्माण झाला होता. अखेर राज्य सरकारने शेतकऱयांना मदत जाहीर केली आहे.
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च 2023पासून 9 हजार 307 कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱयांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आली आहे.
नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील 4 हजार 274 शेतकऱयांना 5 कोटी 65 लाख 55 हजार 735 रुपये, नाशिक जिल्ह्यातील 5 हजार 42 शेतकऱ्यांना 4 कोटी 43 लाख 98 हजार 642 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 हजार 975 शेतकऱ्यांना 2 कोटी 54 लाख 65 हजार 970 रुपये, धुळे जिल्ह्यातील 483 शेतकऱयांना 46 लाख 83 हजार 551 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2 लाख 78 हजार 465 रुपये.
पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 43 हजार 321 शेतकऱयांना 35 कोटी 87 लाख 16 हजार 94 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 13 शेतकऱयांना 4 कोटी 25 लाख 4 हजार 287 रुपये, सांगली जिल्ह्यातील 522 शेतकऱयांना 52 लाख 12 हजार 803 रुपये, पुणे जिल्ह्यातील 390 शेतकऱयांना 32 लाख 74 हजार 489 रुपये आणि सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱयांना 1 लाख 14 हजार 376 रुपये मदतीचा यामध्ये समावेश आहे.
राज्य शासनाने विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी 5 लाख 30 हजार शेतकऱयांना 535 कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱयांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे. – मकरंद जाधव-पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री
– कोकण विभागात पालघर जिल्ह्यातील 1 हजार 742 शेतकऱयांना 1 कोटी 22 हजार 999 रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 920 शेतकऱयांना 23 लाख 47 हजार 667 रुपये, ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱयांना 12 लाख 48 हजार 990 रुपये, रायगड जिल्ह्यातील 161 शेतकऱयांना 10 लाख 67 हजार 86 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकऱयांना 1 लाख 72 हजार 516 रुपये मदत जाहीर झाली आहे.