
ऑनलाइननंतर राज्य शिक्षण मंडळाचा पुन्हा ऑफलाइन अर्ज करण्याचा फतवा आल्याने क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरीकरिता हक्काचे गुण मिळविताना विद्यार्थ्यांची प्रचंड फरफट होत आहे. ऑनलाईनबरोबरच ऑफलाइन अर्ज करण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याकडून अतिरिक्तचे 25 रुपये घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.
2024 पर्यंत क्रीडा गुणांसाठीचे प्रस्ताव ऑफलाइन विभागीय मंडळात सादर करावे लागत होते. त्यासाठी 25 रुपये शुल्क आकारले जाईल. या वर्षी विद्यार्थ्यांना आपलं सरकार पोर्टलवर ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी ऑनलाइनची गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडून अर्ज केले. त्यासाठी त्यांच्याकडून 23 रुपये 60 पैसे ऑनलाइन घेण्यात आले. त्याशिवाय अर्जाचा प्रस्ताव स्वीकारला जात नव्हता. हे सोपस्कार पार पडल्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुन्हा ऑफलाइन म्हणजे मंडळाच्या कार्यालयात येऊन अर्ज देण्यास सांगण्यात आले आहे.
हे पत्र मुळात 18 फेब्रुवारीचे होते. परंतु, अनेक शाळांना ते आता कुठे उपलब्ध झाले आहे. ऑफलाइन अर्ज करताना पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना 25 रुपये भरण्यास सांगण्यात आले आहेत. थोडक्यात एकाच प्रक्रियेकरिता 48.60 रुपये विद्यार्थ्यांकडून आकारले जाणार आहेत. मंडळाच्या या कारभारामुळे विद्यार्थी-शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. ही आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.