राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आणि शहरी विकासातही बहुमूल्य योगदान असणाऱ्या जिल्हा बँकांची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेकडून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा शुभारंभ करताना बँकेचा नवा लोगो, गीत आणि ध्वजाचे अनावरण केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी देशाचा शहरी आणि ग्रामीण अशा सर्वांगीण विकासासाठी लवकरच केंद्राकडून सहकार विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा मोहोळ यांनी केली. तर सहकार विषय शालेय स्तरापासून अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज असल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.
केंद्राकडून यंदाचे वर्ष हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिखर बँक राज्य सहकारी बँकेकडूनही वर्षभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात विविध कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर, शिवाजी कर्डिले, जयंत पाटील, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्यासह राज्यभरातील जिल्हा बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते.
सरकारी व्यवहार सहकारी बँकांतून व्हावेत
राज्यातील सहकारी बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जाचक नियमांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे मुंबई बँकेचे प्रवीण दरेकर म्हणाले. शिवाय सहकारी बँकांच्या सक्षमीकरणासाठी सर्वाधिक सरकारी व्यवहार सहकारी बँकांमधून करण्याची गरज असल्याचे दरेकर म्हणाले.