सांगली, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण उपांत्यपूर्व फेरीत

यजमान सांगलीसह नंदुरबार, कोल्हापूर, पुणे या संघांनी 51 व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सांगलीवाडी (सांगली) येथील चिंचबाग मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. उपउपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने चुरशीच्या लढतीत पुणे शहरचा प्रतिकार 39-37 असा मोडून काढत आगेकूच केली. नंदुरबारने रत्नागिरीला 32-26 असे नमविले. सुरुवात आक्रमक करीत 2 लोण देत नंदुरबारने विश्रांतीला 23-10 अशी आघाडी घेतली. कोल्हापूरने अहिल्यानगरचे आव्हान 31-20 असे संपविले. मध्यांतराला लोण देत 17-08 अशी आघाडी घेणाऱया कोल्हापूरने नंतरदेखील खेळातील जोश कायम राखत आपला विजय सोपा केला. समर्थ देशमुख, सुहास मोहिते यांच्या चढाई-पकडीच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अहिल्यानगरचा आशीष वाघ एकाकी लढला. पुणे ग्रामीणने बीडचा 34-26 असा पाडाव केला.