राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी आजपासून ठाण्यात

पुणे ग्रामीण विरुद्ध नाशिक शहर, अहिल्यानगर विरुद्ध नांदेड या पुरुषांच्या, तर पुणे ग्रामीण विरुद्ध नांदेड, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध ठाणे ग्रामीण या महिला गटातील लढतीने ‘72व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला’ उद्यापासून प्रारंभ होणार आहे. विश्वास सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने 19 ते 23 मार्चदरम्यान ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनीच्या समोरील जे. के. केमिकल कंपनीच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.

ही स्पर्धा मातीच्या सहा क्रीडांगणावर खेळविण्यात येणार असून क्रीडा रसिकांकरिता प्रेक्षक गॅलरीदेखील तयार करण्यात आली आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ निवडण्यात येणार आहेत. हे संघ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत प्रो-कबड्डी स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजविली अशा व त्यांच्यासोबत नवोदित खेळाडूंचादेखील कस लागणार आहे. त्यामुळे कबड्डी रसिकांना कबड्डीचे रंगतदार सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.