
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागपूर येथे झालेल्या समारंभात राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी नागपूर जिल्हा बँकेचा पदभार संस्थात्मक प्रशासक म्हणून स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदि उपस्थित होते.
नागपूर जिल्हा बँकेस राज्य बँकेची शक्तिशाली जोड मिळाल्याने लवकरच जिल्हा बँक पूर्वपदावर येऊन जिह्यातील शेतकऱयांना आर्थिक दृष्टय़ा बळकट करण्याचे कार्य करेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य बँकेच्या सक्षम आर्थिक परिस्थितीचे कौतुक करून राज्य सहकारी बँक ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शासनाच्या सर्व विभागांना पूर्वीप्रमाणे नागपूर जिल्हा बँकेमध्ये व्यवहार करण्याबाबतच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. तत्पूर्वी आमदार आशीष देशमुख यांनी सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांना आणि जनतेला नागपूर जिल्हा बँकेत व्यवहार सुरू करण्याचे आवाहन केले. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी नागपूर जिल्हा सहकारी बँक नफ्यात आणण्यासाठी आखलेल्या नियोजनाची माहिती दिली. कार्यक्रमाला सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार आशीष देशमुख, सहकार आयुक्त दीपक तावरे आदी उपस्थित होते.