माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी प्रक्रिया सुरू; केंद्राने कुटुंबीयांना दिले जागेचे पर्याय

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या स्मारक उभारणीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारने स्मारकासाठी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना काही पर्याय दिले आहेत. त्यांना यापैकी एक जागा निवडण्यास सांगितले आहे, जेणेकरून स्मारकाचे काम सुरू होईल. आता मनमोहन सिंग यांच्या स्मारकाबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्रा, जागा मिळण्यासाठी एक ट्रस्टची स्थापना करण्याची गरज आहे.

स्मारक उभारणीसाठी आधी ट्रस्ट स्थापन करणे आवश्यक आहे. नव्या धोरणानुसार जमिन फक्त ट्रस्टलाच देता येणार आहे. ट्रस्टची स्थापना झाल्यानंतरच स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू करता येईल. ट्रस्ट स्मारकाच्या जमिनीसाठी अर्ज करेल आणि जमीन ताब्यात आल्यानंतर, CPWD सोबत सामंजस्य करार केला जाईल. त्यानंतर स्मारकाचे काम सुरू हणार आहे.

मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी राजघाट, राष्ट्रीय स्मारक किंवा किसान घाटाजवळ एक ते दीड एकर जागा देण्याचे पर्याय केंद्राकडून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. स्मारकाच्या जागेसाठी नगरविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राजघाट आणि आसपासच्या भागाला भेट दिली आहे. नेहरू-गांधी घराण्यातील नेत्यांच्या समाधीजवळ डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा दिली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्या समाधी आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. 28 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा देताना भाजपने राजकारण केल्याचाही आरोप झाला होता. आता मनमोहन सिंग यांच्या स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.