दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करा, अन्यथा यूपीला जाणाऱ्या गाड्या रोखू! शिवसेनेचा मध्य रेल्वे प्रशासनाला खणखणीत इशारा

दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याजागी दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली अशा गाडय़ा मध्य रेल्वेने सुरू केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल कामगार सेनेने आज मध्य रेल्वे मुख्यालयावर धडक दिली. दादर-रत्नागिरी पॅसेंजर लवकरात लवकर पूर्वीच्या वेळेनुसार सुरू न केल्यास आम्ही उत्तर प्रदेशात जाणाऱ्या गाडय़ा रोखू, असा इशारा रेल कामगार सेनेच्या वतीने यावेळी मध्य रेल्वेला देण्यात आला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर 1996-97 पासून दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू आहे. मुंबई आणि उपनगरातून विशेषतः विरार, वसई, बोरिवली, दहिसर, मीरा-भाईंदर, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे, भांडुप येथून हजारे सर्वसामान्य चाकरमानी या पॅसेंजरने प्रवास करतात. रत्नागिरीहूनसुद्धा मुंबईला येणारे प्रवासी या पॅसेंजरने दादरपर्यंत येतात. ज्या लोकांची कुवत एक्प्रेस किंवा मेल ट्रेनने जाण्याची नाही ते सर्व या पॅसेंजरने प्रवास करत होते. परंतु मध्य रेल्वेने अचानक दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर बंद केल्याने या पॅसेंजरवर अवलंबून असणारे तसेच रोजगार मिळणारे असंख्य छोटे छोटे विव्रेते हेदेखील त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसतोय.

कोकणवासीयांवर होणाऱया या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना आणि चीफ ऑपरेटिंग मॅनेजर गुप्ता यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार सुनील शिंदे, उपनेते अरुण दुधवडकर, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, विभागप्रमुख संतोष शिंदे, रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव आदी उपस्थित होते.

परराज्यात जाणाऱयांना प्लॅटफॉर्म कसा उपलब्ध होतो?

प्लॅटफॉर्म आणि रेक उपलब्ध नसल्याचे कारण देत दादर-रत्नागिरी पॅसेंजर रद्द करून त्याचवेळेवर दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली अशा गाडय़ा सुरू करणे म्हणजे कोकणवासीयांवर अन्याय आहे. परप्रांतात जाणाऱया गाडय़ांना प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो मग कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दादरवरून प्लॅटफॉर्म उपलब्ध का होत नाही? असा सवाल विनायक राऊत यांनी विचारला. तातडीने दादर-रत्नागिरी आणि रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करावी, असे राऊत यांनी रेल्वे प्रशासनाला ठणकावले.

प्रशासन ताळय़ावर; रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठवणार

रेल कामगार सेनेच्या दणक्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन ताळ्यावर आले असून दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीच्या वेळेप्रमाणे सुरू करण्यात येईल, असे आश्वासन महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाला पाठवू, असेही त्यांनी सांगितले.