स्टारलाइनर अंतराळयान सुखरुप पृथ्वीवर परतले; अंतराळवीर 2025 मध्ये पृथ्वीवर येणार

गेल्या अनेक दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांच्या स्टारलाइनर या अंतराळ यानात बिघाड झाल्याने सात दिवसांच्या मोहिमेवर गेलेले हे अंतराळवीर अंतराळ स्थानकात अडकले आहेत. आता स्टारलाइनर अंतराळयान सुखरुप पृथ्वीवर परतले असल्याने आता या अंतराळवीरांची प्रतीक्षा आहे.

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर 2025 साली पृथ्वीवर परतणार असल्याची माहिती नासाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली होती. आता स्टारलाइनर यान अंतराळविरांशिवाय पृथ्वीवर पोहोतले आहे. नासाने याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 12.01 मिनिटांनी हे स्टारलाइनर न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स स्पेस हार्बर येथे लॅंड झाले. अशी माहिती नासाच्या अधिकृत अकाऊंटवर देण्यात आली आहे. हे यान लॅंड होण्याच्या अर्धा तास आधी नासाने याचे थेट प्रक्षेपण दाखवले होते.

स्टारलाइनर हे यान सकाळी 9.15 वाजता पृथ्वीवर दाखल झाले. दरम्यान पृथ्वीवर येणाचा स्टारलाइनरचा ताशी वेग हा 2,735 किमी इतका होता. हे यान पृथ्वीवर उतरताचा व्हि़डीओ नासाने शेअर केलाय. ज्यामध्ये यान उतरण्याची संपूर्ण प्रक्रिया दिसत आहे. स्टारलाइनरच्या लँडिगचया अवघ्या 3 मिनिटांपूर्वी अंतराळ यानाचे 3 पॅराशूट उघडले आणि यान सुखरुपपणे लँड झाले.

5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळ मोहिमेवर गेले होते. यावेळी हे फक्त 8 दिवसांचे मिशन होते. मात्र अंतराळातच यानात बिघाड झाल्यामुळे सुनीता आणि बुश विल्मोर तिथेच अडकले आहेत. त्यामुळे आता या अंतराळविरांचा परतीचा प्रवास लांबणीवर गेला आहे. मात्र, आता हे यान सुखरुप परतल्याने अंतराळवीरही लवकरच पृथ्वीवर येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.