
‘गद्दार’ गीताद्वारे मिंधे गटाच्या कृत्यांची चिरफाड करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज अंतरिम दिलासा मिळाला. जबाब नोंदवण्यासाठी कुणालला अटक करण्याची आवश्यकता नाही, त्याचा जबाब तामिळनाडूमध्ये जाऊन नोंदवू शकत नाही का, असा सवाल करत हायकोर्टाने कुणालवर सूड उगवण्यापासून सरकारला तूर्तास रोखले. निकाल जाहीर करेपर्यंत कुणालविरोधात कारवाई करू नका, असे बजावत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गायलेले विडंबनात्मक ‘गद्दार’ गीत मिंधे गटाला चांगलेच झोंबल्याने मिंध्यांकडून कुणालला धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणी आकसापोटी मिंध्याच्या कार्यकर्त्यांनी कुणालविरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे रद्द करण्यात यावेत तसेच धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाईपासून तातडीने दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करत कुणाल कामरा याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी राज्य सरकारच्या वतीने अॅड. हितेन वेनेगावकर यांनी युक्तिवाद केला, तर कुणाल कामराच्या वतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी युक्तिवाद केला.
अजितदादाही मिंध्याना गद्दार म्हणाले
ज्येष्ठ काwन्सिल नवरोज सिरवाई यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की, सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील शिंदे यांना ‘गद्दार’ म्हणून संबोधले होते. तरीही मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत कोणतीही तक्रार किंवा कारवाई केली नाही, मात्र कुणालविरोधात हेतुपुरस्सर व जाणूनबुजून एफआयआर नोंदवण्यात आला.